विश्वचषक २०२३ च्या उपांत्य फेरीसाठी तीन संघ आधीच पात्र ठरले होते. चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात स्पर्धा होती. येथे, न्यूझीलंडने आपला शेवटचा सामना अशापद्धतीने जिंकला आहे की टॉप ४ चा मार्ग अफगाणिस्तानसाठी पूर्णपणे बंद झाला, तर पाकिस्तानसाठीही तो जवळजवळ बंद झाला.
न्यूझीलंडने या स्पर्धेत ९ सामन्यांत ५ विजय मिळवून १० गुणांची नोंद केली. त्याचा नेट रन रेट ०.७४३ आहे. दुसरीकडे, पाकिस्तान संघाचे ८ सामन्यांत ४ विजयानंतर ८ गुण आणि ०.०३६ नेट रन रेट आहे. येथे न्यूझीलंड नेट रन रेटमध्ये पाकिस्तानपेक्षा खूप पुढे गेला आहे. आता पाकिस्तानला शेवटच्या सामन्यात फक्त विजय नाहीतर त्यांना असा विजय नोंदवावा लागेल जे आजपर्यँत कधीच केलेलं नाही.
पाकिस्तानला आता अभूतपूर्व चमत्कार आवश्यक
खरेतर, आता पाकिस्तानला विश्वचषक उपांत्य फेरीत खेळण्यासाठी विचित्र समीकरण समोर आले आहे. पाकिस्तानने शेवटच्या सामन्यात इंग्लंडला २८७ धावांनी पराभूत केले किंवा इंग्लंडला १५० धावांवर रोखले आणि ३.४ षटकात लक्ष्य गाठले, तरच त्यांना न्यूझीलंडसंघावर मात करत उपांत्य फेरीत पोहचता येईल. इथे दुसरे समीकरण अशक्य आहे पण पहिले समीकरण शक्य आहे. मात्र, त्यांच्यासाठी पहिली गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे पाकिस्तानने नाणेफेक जिंकणे. पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना स्कोअरबोर्डवर किमान ४५० धावा केल्या पाहिजेत हे दुसरे काम असेल. आणि मग तिसरे काम असेल इंग्लंडला १६० धावांच्या आत रोखणे. ही तिन्ही कामं शक्य आहेत पण खूप अवघड आहेत. इंग्लंडची कामगिरी चांगली राहिली नसली तरी इंग्लिश संघ इतका लेचापेचा नक्कीच नाही की तो सहज हार मानेल.
ईडन गार्डन्स
पाकिस्तान संघ आपला शेवटचा सामना ईडन गार्डन्सवर खेळणार आहे. या स्पर्धेत येथील सरासरी धावगती ५ पेक्षा कमी आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानला येथे ४५० धावा करणे अशक्य होईल. त्यानंतर इडन गार्डन्सवर फिरकीपटूंना चांगली मदत मिळत आहे. पण पाकिस्तानकडे एकही स्पेशालिस्ट फिरकी गोलंदाज नाही. अशा स्थितीत पाकिस्तानला उपांत्य फेरीत प्रवेश करणे आता जवळपास अशक्य दिसते आहे.