नवी दिल्ली : विश्वचषक २०२३ नंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० मालिका खेळताना दिसणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २३ नोव्हेंबरपासून ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. त्यांचा पहिला सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमारला संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याला घोट्याला दुखापत झाली होती. तो अजून तंदुरुस्त झालेला नाही. T20 मालिकेसाठी घोषित केलेल्या १५ सदस्यीय संघात अनेक खास गोष्टी आहेत, त्याबद्दल जाणून घेऊया.

भारताचा संघ पुढीलप्रमाणे –

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार, पहिले तीन सामने), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिध्द कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर (उपकर्णधार, शेवटचे दोन सामने).

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधील कामगिरीला प्राधान्य नाही

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ही भारताची प्रमुख टी-२० स्पर्धा आहे. यामध्ये अनेक खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली पण कोणालाही टीम भारतीय संघामध्ये स्थान मिळाले नाही. रियान परागने सलग ७ सामन्यात अर्धशतक ठोकले होते. निवड समितीने आपल्या निर्णयात स्पष्ट केले आहे की, टी-२० संघात समाविष्ट होण्यासाठी आयपीएलमध्ये कामगिरी करावी लागेल.

युझवेंद्र चहलकडे टी-२० मध्येही दुर्लक्ष

स्टार लेगस्पिनर युजवेंद्र चहलला विश्वचषक संघात स्थान मिळाले नव्हते. या टी-२० मालिकेत त्याला संधी मिळेल, अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही. रवी बिश्नोई लेगस्पिनर म्हणून संघात आहे. चहल हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. १०० विकेट पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त ४ विकेटसची गरज आहे. असे असतानाही त्याला संघात संधी देण्यात आलेली नाही.

गिल आजारी, किशनला संधी; वेंगसरकरांकडून सूर्यकुमारला प्लेइंग ११ मध्ये घेण्याचा सल्ला

श्रेयस अय्यर उपकर्णधार

श्रेयस अय्यर मालिकेतील पहिले तीन सामने खेळणार नाही. त्यामुळे ऋतुराज गायकवाड संघाचा उपकर्णधार असेल. आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्याने कर्णधारपद भूषवले होते. मात्र श्रेयस अय्यर चौथ्या सामन्यात पुनरागमन करेल. संघात सामील होण्यासोबतच तो उपकर्णधारही असेल. वर्षभरापूर्वी तो भारताकडून शेवटचा टी-२० सामना खेळला होता. भारतीय संघाचा भावी कर्णधार म्हणूनही अय्यरचा विचार केला जात आहे.

संजूपेक्षा जितेशला संधी

संजू सॅमसनला पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळालेले नाही. इशान किशन आणि जितेश शर्मा या दोन यष्टीरक्षकांना संघात स्थान मिळाले आहे. आशियाई स्पर्धेतही संजूला संधी मिळाली नाही. २०१५ मध्ये पदार्पण करणारा संजू सॅमसन भारताकडून आतापर्यंत केवळ २४ टी-२० सामने खेळला आहे.

विश्वचषक संघातील तीन खेळाडू

विश्वचषक खेळलेल्या तीन भारतीय खेळाडूंचा टी-२० मालिकेत समावेश करण्यात आला आहे. यात सूर्यकुमार यादवसह इशान किशन आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या भूमिका आहेत. दुखापतग्रस्त हार्दिकच्या जागी संघात आलेल्या प्रसिध्दला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. गेल्या ९ सामन्यांमध्ये इशान बेंचवर होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *