विजयानंतर चंद्रकांत पाटील यांचे साष्टांग दंडवत:म्हणाले, सर्व श्रेय महाराष्ट्र आणि कोथरुडच्या जनतेचे
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सातत्याने सर्व कार्यकर्ते झटून कामाला लागले. प्रसंगी कुटुंबियांचाही रोष पत्करून काम केले, त्यामुळे तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचा शतशः आभारी आहे, अशी भावना चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली. विशेष म्हणजे, यावेळी त्यांनी साष्टांग दंडवत घालत सर्व कार्यकर्त्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कोथरुड विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर मंडल कार्यालयात चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांचेही आभार मानले. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, कोथरुड मधील विजयासाठी गेले महिनाभर रात्रंदिवस सर्व कार्यकर्ते एक दिलाने झटत होते. प्रसंगी कुटुंबियांचा रोष पत्करून देखील काम करत होते. तुम्हा सर्व कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमामुळेच हा ऐतिहासिक विजय साकार झाला. त्यामुळे तुम्हा सर्वांचा ही मी शतशः आभारी आहे. तसेच, गेले महिनाभर तुम्हाला साथ देणाऱ्या कुटुंबियांचे ही मनापासून आभार मानतो. विजयाचे सर्व श्रेय महाराष्ट्र आणि कोथरुडच्या जनतेचे राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयाचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी, अमित शाह, जेपी नड्डा महाराष्ट्रातील जनतेचे आणि कोथरूडकर जनतेचे आहे, अशी भावना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केली. कोथरूड मधील विजयानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीतील महायुतीचा विजय हा महाराष्ट्रातील जनतेचे आहे. या विजयाने लोकसभा निवडणुकीतील कसर धुवून निघाली अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांत कोथरूडकरांची मनापासून सेवा केली. कोथरुड मधील प्रत्येक कुटुंबाशी जोडला गेलो. त्यामुळे आजचा माझा विजय हा कोथरूड मधील प्रत्येक नागरिकाचा आहे. कोथरूड मधील जनतेची पुन्हा त्याच जोमाने सेवा करेन, अशी भावना व्यक्त केली.