चिकन खाल्ल्याने वाघांना बर्ड फ्लूची लागण:नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये डिसेंबर महिन्यात तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाला होता. या प्राण्यांचा मृत्यू बर्ड फ्ल्यू (H5N1) मुळे झाल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. आता वाघ आणि बिबट्याला नेमका बर्ड फ्लू कसा झाला? याबाबत राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी माहिती दिली आहे. चिकन खाल्ल्याने वाघाला झाला बर्ड फ्लू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू तीन वाघ आणि एका बिबट्याचा मृत्यू झाल्याने खळबळ माजली होती. डिसेंबरमध्ये वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवले होते. या प्राण्यांचा मृत्यू एच-5एन-1 विषाणूमुळे झाल्याचा अहवाल राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानने दिला. तीनही वाघ तीन ते चार वर्षाचे होते. तर बिबट्या 7 ते 8 महिन्यांचा होता. वनमंत्री गणेश नाईक यांनी याबाबत माहिती दिली आहे. काय म्हणाले वनमंत्री गणेश नाईक?
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरच्या अधिकाऱ्यांना चंद्रपूरला बोलावले आहे. चिकन खाल्ल्याने वाघांना बर्ड फ्लूची लागण झाली अशी प्राथमिक माहिती आहे. याची सत्यता तपासली जाईल, असे गणेश नाईक यांनी सांगितले. खाद्य तपासून द्या, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्राणीसंग्रहालयाला दिल्याचे ते म्हणाले. या प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर काय निष्पन्न होईल ते पाहावे लागेल. प्रादुर्भाव झालेले प्राणीसंग्रहालय तात्पुरते बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती गणेश नाईक यांनी यावेळी दिली आहे. नेमके प्रकरण काय?
गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये तीन वाघांना उपचारासाठी आणण्यात आले होते. हे तीनही वाघ मानवी वस्त्यांवरील हल्ल्यांमुळे बंदीस्त करण्यात आले होते. वाघ डिसेंबर 2024 च्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूरातील टीटीसीतून, तर बिबट बुलढाण्यातून मे 2024 मध्ये आला होता पण उपचारादरम्यान तीन वाघ आणि एका बिबट्याचा 20 ते 23 डिसेंबरदरम्यान मृत्यू झाला. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर व्हिसेराचे नमुने भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा प्राणी रोग संस्थानकडे पाठवण्यात आले. प्रयोगशाळेतील नमुन्यांच्या चाचणीचा अहवाल 1 जानेवारी 2025 रोजी समोर आला होता. वाघ आणि बिबट्याचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे या अहवालात म्हटले होते. देशातील पहिलीच घटना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि प्राणी आणि सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजनांची रूपरेषा आखण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बर्ड फ्लूमुळे वाघाचा मृत्यू होण्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याची माहिती गोरेवाडा रेस्क्यू सेंटरचे संचालक शतानिक भागवत यांनी दिली.