मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे, असे भाजप खासदार नारायण राणे यांनी म्हटले आहे. भाजप आमदार व मंत्री नितेश राणे यांनी काही दिवसांपूर्वी धाराशिव येथे बोलताना महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, असे वक्तव्य केले होते. त्यावरून महायुतीमध्ये अंतर्गत वाद पेटला होता. त्यानंतर नीलेश राणे यांनी देखील ट्विट करत नितेश राणे यांना विधाने जपून करावीत असा सल्ला दिला होता. आता नारायण राणे यांनी देखील समज दिल्याचे समजते. नारायण राणे म्हणाले, मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला समज दिली आहे. मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा. नारायण राणे हे धाराशिव येथे आले होते. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणाचा निधी अडवणे हे चुकीचे आहे, त्याबद्दल मी सूचना देणार असल्याचे देखील राणे यांनी म्हटले आहे. प्रकाश महाजन हा मेंटल माणूस नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसे नेते प्रकाश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, प्रकाश महाजन हा मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहतो क्रांती चौकात, त्याला भेटायला मी यायचे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले, याबद्दल मला माहीत नाही. ते एकत्र आले तर चांगलीच गोष्ट आहे. नितेश राणे काय म्हणाले होते? धाराशिव येथील कार्यक्रमात नितेश राणे यांनी भाषण केले. यावेळी ते म्हणाले होते की, कोणी कितीही ताकद दाखवली, कसेही नाचले तरी महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप बसला आहे हे लक्षात ठेवा, असे विधान केले होते. यावरून त्यांच्यावर महायुतीमधील इतर पक्षाच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. तसेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी नाराजी व्यक्त केली होती. शिवसेना ठाकरे गटाकडून नितेश राणेंच्या विरोधात बॅनरबाजी ठाण्यात तीन हात नाका परिसरात शिवसेना ठाकरे गटाकडून नितेश राणे यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले होते. ठाकरे गटाचे सहप्रवक्ता तुषार रसाळ यांनी भलामोठा बॅनर लावला होता. यावर ‘मी तुषार दिलीप रसाळ.. दिलीप पंढरीनाथ रसाळ हे माझे जन्मदाता (बाप). श्री. देवेंद्र गंगाधर फडणवीस हे माझे बाप नाहीत’, असा मजकूर लिहिला होता. या बॅनरचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. त्यानंतर ठाणे मनपाने हे बॅनर हटवले आहेत.