या पार्श्वभूमीवर आता एन.व्ही. रमणा यांनीच केंद्र सरकारला आपल्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सूचवले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ न्या. उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) म्हणजेच यू.यू. लळीत हे आपले उत्तराधिकारी असतील, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे देशाचे पुढील सरन्यायाधीश हे उदय लळीत (UU Lalit) असतील, यावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. आता याविषयीची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे. सर्व काही ठरल्याप्रमाणे पार पडल्यास उदय उमेश लळीत (Uday Umesh Lalit) हे भारताचे ४९वे सरन्यायाधीश होतील. शपथ घेऊन ते २७ ऑगस्ट २०२२ रोजी पदभार स्वीकारु शकतात. महाराष्ट्रात ऐतिहासिक राजकीय परिस्थिती निर्माण झाली असताना उदय लळीत यांचे सरन्यायाधीशपदी विराजमान होणे, हा एक अनोखा योगायोग मानला जात आहे. पण उदय लळीतही फार दिवस सरन्यायाधीश राहू शकणार नाहीत. त्यांचा कार्यकाळ अवघ्या ७४ दिवसांचा असेल. सरन्यायाधीशपदी विराजमान झाल्यास उदय लळीत ८ नोव्हेंबर २०२२ रोजी निवृत्त होतील.
कोण आहेत न्या. उदय लळीत?
न्या. उदय उमेश लळीत हे महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्याचे सुपुत्र आहेत. गिर्ये-कोठारवाडी येथे त्यांचे मूळ घर आहे. त्यांचे आजोबा सोलापूरला वकिली करण्याच्या निमित्ताने स्थायिक झाले. त्यांचे वडील उमेश लळीत हे १९७४ ते १९७६ या काळात हायकोर्टात न्यायमूर्ती होते. उदय लळीत यांनी मुंबई विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करून ज्येष्ठ विधिज्ञ सोराबजी यांच्यासोबत काम केले. अनेक वर्षे लळीत सर्वोच्च न्यायालयात स्वतंत्रपणे वकिली करत होते. उदय लळीत १३ ऑगस्ट २०१४ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून काम करत आहेत.