चिंताग्रस्त मध्यमवर्गासाठी आर्थिक लॉलीपॉप:पंतप्रधानांनी दिलेला उपाय वृत्तपत्रांसाठी चांगला मथळा, प्रकाश आंबेडकरांची अर्थसंकल्पावर टीका

चिंताग्रस्त मध्यमवर्गासाठी आर्थिक लॉलीपॉप:पंतप्रधानांनी दिलेला उपाय वृत्तपत्रांसाठी चांगला मथळा, प्रकाश आंबेडकरांची अर्थसंकल्पावर टीका

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून शनिवारी देशाचा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला. या अर्थसंकल्पात आयकराबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे. नवीन कर प्रणालीनुसार आता 12 लाख रुपयांपर्यंतच्या कमाईवर कोणताही कर भरावा लागणार नाही. काल अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आज एक्सवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे चिंताग्रस्त मध्यमवर्गासाठी एक आर्थिक लॉलिपॉप असल्याचे ते म्हणाले. मध्यमवर्गातील सर्वात खालचा वर्ग आयकर भरत नाही. मग जे आयकर भरत नाहीत, अशा बहुसंख्य मध्यमवर्गीयांना ही आयकर सवलत कशी मदत करेल, असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. अर्थसंकल्पात शेती, आरोग्य, रोजगार, लघू आणि मध्यम उद्योग, निर्यात, गुंतवणूक, ऊर्जा, नागरीकरण, खाणकाम, अर्थ, कर या क्षेत्रांना प्राधान्य देण्यात आले आहे. एनडीएकडून या अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यात आले असले, तरी विरोधक मात्र या अर्थसंकल्पावर टीका करत आहेत. ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील आयकर सवलतीवर सवाल उपस्थित केला होता. आयकर सवलतीची घोषणा तर केली, पण कमवायचे कसे? असे ते म्हणाले होते. आता प्रकाश आंबेडकर यांनी देखील यावरून प्रश्न उपस्थित केला. काय म्हणाले प्रकाश आंबेडकर? 2025 चा केंद्रीय अर्थसंकल्प विशेषतः 12 लाख रुपयांच्या उत्पन्न करात सवलत, हे चिंताग्रस्त मध्यमवर्गासाठी एक आर्थिक लॉलिपॉप आहे! 2022-23 मध्ये, फक्त 2.24 कोटी भारतीय किंवा मध्यमवर्गातील सर्वसामान्यांनी उत्पन्न कर भरले. मध्यमवर्गातील सर्वात खालचा वर्ग आयकर भरत नाही. मग आयकर सवलत ही बहुसंख्य मध्यमवर्गीयांना कशी मदत करेल, जे आयकरच भरत नाहीत? हे लोक उपभोगावर जीएसटीच्या स्वरूपात कर भरतात, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. बहुसंख्य लोकांवर पूर्वीपेक्षा जास्त ओझे
प्रकाश आंबेडकर आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हणतात, दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, कर सवलतीचे अर्थमंत्र्यांचे मोठे दावे बहुसंख्य मध्यमवर्गीयांना मदत करणार नाहीत आणि त्यांच्या खरेदी क्षमतेतही वाढ होणार नाही. तसेच, अर्थमंत्र्यांनी या बहुसंख्य लोकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. उत्पन्न आणि खरेदी क्षमतेत कोणतीही वाढ न झाल्याने, हे बहुसंख्य लोकांवर पूर्वीपेक्षा जास्त ओझे निर्माण झाले आहे. यामुळे कर सवलत, वाढलेली क्रयशक्ती आणि वाढता वापर या भोवतीचा गोंधळ केवळ एक विनोद बनतो कारण त्यामुळे बहुसंख्य लोक वंचित राहतील. पंतप्रधानांनी दिलेला उपाय हा वृत्तपत्रांसाठी एक चांगला मथळा आणि मध्यमवर्गासाठी एक तुष्टीकरण, एक लॉलिपॉप आहे!, असे आंबेडकर म्हणाले. अर्थसंकल्पावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया
2012-14 च्या सुमारास निवडणुकीपूर्वी आयकर रद्द करण्याची घोषणा करणारा भाजप आता अधिक उदार झाल्याचे दिसत आहे. आता ते करांची श्रेणी आणि रिबेटवर करदात्यांशी वाटाघाटी करत असल्यासारखी करसवलत जाहीर करत आहेत. बऱ्याच अटी आणि अनेक छुप्या करांसह ही करसवलत देण्यात येत आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. आता सरकार आयकर सवलती आणि अतर सवलतींबाबत घोषणा करत आहे. मात्र, त्यांनी जाहीर केलेल्या आयकर श्रेणींपर्यंत पैसे कसे कमवायाचे, याचे काही मार्ग त्यांनी ठेवले आहेत काय? असा सवाल करत देशात सर्वाधिक बेरोजगारी असताना ती रोखण्यासाठी अर्थसंकल्पात कोणतीही उपाययोजना करण्यात आली नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. हे ही वाचा… बजेट 2025 – 10 पॉइंट्समध्ये:करमुक्त उत्पन्न मर्यादा आता ₹12 लाख, फोन-EV स्वस्त होणार; बिहारमध्ये 3 नवीन विमानतळ होणार

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment