उत्तर प्रदेशातील बहूजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांची दलित मतदारांवरील पकड ढिली होत असल्याचं दिसून आलं आहे. मायावती सध्या इंडिया आघाडी किंवा एनडीए दोन्हीपासून दूर आहेत. त्या स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. या पार्शवभूमीवर उत्तर प्रदेशात इंडिया आघाडीला मजबूत करण्यासाठी काँग्रेस दिग्गजांना उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगू शकते, अशी चर्चा आहे. टाइम्स ऑफ इंडिया ला काँघ्रेस पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे उत्तर प्रदेशमधील कोणत्याही आरक्षित जागेवरुन निवडणूक लढवू शकतात. यामुळं त्यांच्यासह काँग्रेसला दलित मतदारांवर पकड मिळवता येऊ शकते. बसपा प्रमुख मायावती यांचा दलित मतदारांवरील प्रभा कमी झाला असून ती पोकळी भरण्यासाठी मल्लिकार्जुन खरगे यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्यासंदर्भात काँग्रेसकडून तयारी सुरु असल्याचं बोललं जात आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांना काँग्रेसकडून इटावा किंवा बाराबंकी लोकसभा मतदारसंघातून मैदानात उतरवलं जाऊ शकतं. काँग्रेसनं मल्लिकार्जुन खरगेंना इटावामधून उमेदवारी दिल्यास त्या भागातील इतर लोकसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीला फायदा होऊ शकतो. कारण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सपा आणि काँग्रेस इंडियाच्या छताखाली एकत्र आलेले आहेत. मल्लिकार्जुन खरगे त्यांच्या पारंपारिक लोकसभा मतदारसंघासह आणखी एका मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात, असं सांगितलं जात आहे.
काँग्रेसच्या दाव्यानुसार खरगे यांच्याशिवाय काँग्रेस खासदार राहुल गांधी हे वायनाड आणि अमेठीतून निवडणूक लढवतील. प्रियांका गांधी प्रयागराज, फुलपूर किंवा वाराणसी पैकी एका मतदारसंघातून निवडणूक लढवतील. प्रकृतीच्या कारणांमुळं सोनिया गांधी यांनी रायबरेलीतून माघार घेतल्यास प्रियांका गांधी या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. त्यांच्यासाठी हा मतदारसंघ चांगला पर्याय आहे.