रवी राजांसोबतचा काँग्रेसचा संबंध संपला:आता त्यांनी आहे तिथेच रहावे, काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांचा संतप्त सूर
मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्या भाजप प्रवेशावर खासदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. रवी राजा व आमचा संबंध संपला. आता त्यांनी ते जिथे आहेत, तिथेच रहावे, असे त्यांनी म्हटले आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षांतराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबई महापालिकेतील काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी गुरुवारी काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश केला. त्यांच्या या सोडचिठ्ठीवर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिकीट मिळत नाही म्हणून पक्ष सोडणे चुकीचे वर्षा गायकवाड म्हणाल्या, माझी दोनच दिवसांपूर्वी रवी राजा यांच्याशी भेट झाली. आमच्या प्रभारींनीही त्यांची भेट घेतली. त्यांची समजूत काढली. एखादे तिकीट मिळाले नाही म्हणून नाराज होणे चुकीचे आहे. सर्वांनीच पक्षाशी एकनिष्ठ राहण्याची गरज आहे. सत्ता मिळत नाही, तिकीट मिळत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात जाणे योग्य नाही. आज रवी राजा यांचा जो काही चेहरा बनला, तो केवळ काँग्रेसमुळे बनला. ते पाचवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले. पण आता त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. 1995 साली माझ्या वडिलांनीही उमेदवारी मिळाली नव्हीत. त्यानंतर मलाही सुरुवातीच्या काळात पक्षाने उमेदवारी नाकारली. यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही आम्हाला ज्या ठिकाणी तिकीट हवे होते, तिथे पक्षाने तिकीट दिले नाही. याचा अर्थ आम्ही नाराज झालो असे नाही. पण रवी राणा यांची नाराजी जगजाहीर होती. त्यांनी केवळ तिकीट मिळाले नाही म्हणून पक्ष बदलला. रवी राजा व आमचा संबंध संपला वर्षा गायकवाड पुढे म्हणाल्या, रवी राजा यांना भाजपने कोणते पद दिले हे मला माहिती नाही. पण आता आमचा व त्यांचा संबंध संपला आहे. त्यांनी आता ते जिथे आहेत, तिथेच रहावे. त्यांना काँग्रेसने विरोधी पक्षनेतेपद दिले. हे पद आमदाराच्या बरोबरीचे होते. पण त्यानंतरही त्यांनी केवळ आमदारकीचे तिकीट मिळत नाही म्हणून पक्षांतर केले. त्यांच्या पक्ष सोडण्यामागे त्यांच्या मागचे काही प्रकरणेही कारणीभूत आहेत. त्यांनी हा निर्णय घेताना या प्रकरणाचाही विचार केला असेल, असेही वर्षा गायकवाड यावेळी बोलताना म्हणाल्या.