अहमदनगर: राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सायकलपटू व २०२२ वर्षात दोन वेळा डबल एस.आर. चा मान पटकाविणारा जस्मितसिंह वधवा दिल्ली जवळील फरिदाबाद पलवल टोलनाक्याजवळ नुकतेच झालेल्या अपघातामध्ये थोडक्यात बचावला. मागून सुसाट वेगाने आलेल्या कंटेनरने त्याला धडक दिली. दैव बलवत्तर म्हणून किरकोळ फ्रॅक्चर होऊन त्याचे प्राण वाचले. या घटनेत सायकलचा पूर्णत: चेंदामेंदा होऊन सायकलपटू वधवा पुढे फेकला गेला. जस्मित अहमदनगरला परतला असून, त्याची प्रकृती सुधारली आहे.

जस्मितसिंह वधवा याने यावर्षी १ हजार, ६०० व ४०० कि.मी. चे प्रत्येकी दोन राऊंड तर ३०० व २०० कि.मी. चे प्रत्येकी तीन राऊड पूर्ण केले आहेत. पाच दिवसाच्या एस.आर. साठी तो दिल्ली येथे गेला होता. यामध्ये त्याचे १५०० कि.मी. सायकलिंग करण्याचा मानस होता. एस.आर. म्हणजे सुपर रायडिंग ज्या मध्ये दिवस-रात्र सायकल चालवावी लागते. २४ तासांमध्ये तो फक्त दोन ते चार तास आराम करतो.

पाहिल्या दिवशी ४०० कि.मी.च्या राईडला जाताना जस्मितच्या सायकलचे हब तुटले. त्या ठिकाणी त्याला माघार घ्यावी लागली. तिसऱ्या दिवशी ५०० कि.मी. च्या राईडवर जस्मितसह आणखी तीन सायकलिस्ट होते. फरिदाबाद पलवल येथील टोल नाक्याजवळ अचानक पाठीमागून आलेल्या कंटेनरने त्याला जोरदार धडक दिली. कंटेनरचालक नंतर पळून गेला. हा प्रकार रात्री १ वाजता घडला. त्याठिकाणी त्यांच्या सोबत असलेले दुसरे सायकल स्वाराने आयोजक चिरो मित्रा यांना फोन करुन तात्काळ त्या ठिकाणी पाचारण केले. जस्मित रस्त्याच्या कडेला बेशुद्ध अवस्थेत होता आणि सायकलचा पूर्ण चेंदामेंदा झाला होता. नशिबाने साथ दिल्याने रुग्णवाहिका पाच मिनिटातच उपलब्ध झाली. जस्मित दहा मिनिटात पलवल येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पहाटे पाच वाजेपर्यंत तो बेशुद्ध अवस्थेत एकटाच हॉस्पिटलमध्ये होता. त्याच्याबरोबर असलेल्या सायकपटूंनी त्याच्या उपचाराच्या सर्व पूर्तता करुन व त्याच्या नातेवाईकांना कळवून पुढील राइडसाठी निघून गेले.

जेव्हा जस्मितशी त्याच्या कुटुंबीयांनी संपर्क साधला, त्यावेळी त्याला काय घडलं ते आठवतच नव्हते. राईड संपल्यावर त्याच्याबरोबर असलेल्या सायकलपटूंनी घडलेला प्रकार सांगितल्याने हकीगत समोर आली. यामध्ये कंटेनरने जस्मितला धडक दिल्यावर तो वीस फूट लांब सायकलवरून फेकला गेला. हेल्मेटचे दोन तुकडे झाले. यामध्ये जस्मितला थोडीशी इजा व पाठीवर एक छोटासा फ्रॅक्चर झाला आहे.

सायकल शर्यतींवर प्रश्नचिन्ह

या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वाधवा यांनी सायकलपटूंच्या अपघाताबाबत चिंता व्यक्त केली. भारतात बी.आर.एम, एस.आर असे अनेक सायकल राईड होतात. सायकलिंग करताना अनेक सायकलपटूंनी जीव गमावला आहे. अनेकांना अपघातामुळे अपंगत्व आले आहे. आंतरराष्ट्रीय ऑडेक्स ही संघटना अपघात टाळण्यासाठी रस्त्यांची पाहणी करते, त्यांनी भारताच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे वेगळे काही नियम तयार करू शकतात का ? याकडे विचार करण्याची गरज आहे. प्रदुषणमुक्त व आरोग्यासाठी लाभदायी असणार्‍या सायकलिंगसाठी रस्त्यावर वेगळी लाईन केली जाऊ शकते का? यावर विचारमंथनाची गरज आहे, असे हरजितसिंह वाधवा यांनी म्हटले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *