क्रिस्टियानो रोनाल्डोने त्याच्या कारकिर्दीतील 900 वा गोल केला:अशी कामगिरी करणारा जगातील पहिला खेळाडू ठरला; पोर्तुगालने क्रोएशियावर 2-1 ने मात केली
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने गुरुवारी क्रोएशियाविरुद्धच्या सामन्यात कारकिर्दीतील 900 वा गोल केला. अशी कामगिरी करणारा तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. एस्टाडिओ दा लुझ स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या नेशन्स लीग स्पर्धेच्या या सामन्यात पोर्तुगालने क्रोएशियाचा 2-1 असा पराभव केला. रोनाल्डोने सामन्याच्या 34व्या मिनिटाला गोल करत ही कामगिरी केली. नुनो मेंडिसच्या क्रॉसवरून गोल करत रोनाल्डोने व्यावसायिक फुटबॉलमध्ये इतिहास रचला. हा टप्पा गाठल्यानंतर रोनाल्डोने त्याच्या फुटबॉल प्रवासाची एक क्लिप सोशल मीडियावर शेअर केली. हा व्हिडिओ शेअर करताना रोनाल्डोने सर्व चाहत्यांचे आभार मानले आहेत. खूप दिवसांपासून हे स्वप्न पाहिलं होतं, ते पूर्ण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. अजून काही स्वप्ने पूर्ण व्हायची आहेत. पोर्तुगालसाठी हा त्याचा 131 वा गोल आहे
रोनाल्डोच्या कारकिर्दीला 2002 मध्ये सुरुवात झाली. पोर्तुगालसाठी हा त्याचा 131वा गोल ठरला. त्याच्या 900 गोलांपैकी निम्मे गोल रिअल माद्रिदसाठी झाले आहेत. याशिवाय तो मँचेस्टर युनायटेड, जुव्हेंटस आणि सध्याचा क्लब अल नासेरकडून खेळला आहे. पोर्तुगालने क्रोएशियावर 2-1 ने मात केली
या सामन्यात रोनाल्डोच्या गोलपूर्वी डिओगो डालोटच्या गोलने पोर्तुगालला सुरुवातीलाच आघाडी मिळवून दिली होती. यानंतर रोनाल्डोने 34व्या मिनिटाला गोल करत आघाडी दुप्पट केली. मात्र, त्यानंतर दलोतने स्वत:चा गोल केला. दोन्ही संघ पोलंड आणि स्कॉटलंडसह नेशन्स लीगच्या A-1 गटात आहेत. पोर्तुगालचा सामना रविवारी स्कॉटलंडविरुद्ध होणार आहे.