म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या मेळाव्यावरून शिवसेना आणि शिंदे गटात चढाओढ सुरू असतानाच, आता परवानगीसाठी पालिकेचे दोन गटही परस्परांकडे बोट दाखवत आहेत. दसऱ्याला फक्त १५ दिवस उरले आहेत. मात्र, शिवसेनेला शिवाजी पार्क मैदानासाठी अद्याप मुंबई महापालिकेची परवानगी मिळालेली नाही. मैदान कुणाला द्यायचे, याबाबत पालिकेच्या दादर जी उत्तर विभागाने विधी विभागाचा सल्ला मागितला आहे. तर या विभागाने आपल्याकडे जी उत्तर विभागाचे पत्र अद्याप आलेले नाही, असे उत्तर दिले आहे. त्यामुळे दोन विभागांतील बेबनाव चव्हाट्यावर आला आहे. मेळाव्यासाठी मैदान मिळू नये, यासाठीच ही टाळाटाळ सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाने पालिकेकडे परवानगी मागितली आहे. शिंदे गटाला वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान मिळाले असले, तरी त्यांनी अद्याप शिवाजी पार्कचा दावा सोडलेला नाही. सेनेने सर्वात आधी २२ ऑगस्ट व १६ सप्टेंबरला स्मरणपत्राद्वारे जी उत्तर विभागात अर्ज केला आहे. मात्र, पालिकेने अद्याप कुणालाही परवानगी दिलेली नाही. मेळावा १५ दिवसांवर आला असून, व्यासपीठ व इतर तयारीसाठी काही दिवस लागणार असल्याने आधी परवानगी मिळणे आवश्यक आहे, याकडे लक्ष वेधत शिवसेना उपनेते मिलिंद वैद्य यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंगळवारी जी-उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे यांची भेट घेतली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळापासून शिवतीर्थावर दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेची ही ५६ वर्षांची परंपरा आहे. यापूर्वी चार दिवसांत परवानगी दिली जात होती. यंदा पत्र देऊन एक महिना उलटल्यानंतरही पालिकेने परवानगी दिलेली नाही, यामागची कारणे काय, अशी विचारणा वैद्य यांनी सपकाळे यांना केली. त्यावर सपकाळे यांनी याप्रकरणी प्रशासनाने आपल्या विधी विभागाचा सल्ला मागितला आहे, अशी माहिती दिली. तसेच विधी विभागाला दिलेल्या पत्राची प्रत वैद्य यांना देण्यात आली. याबाबत ‘मटा’ने विधी विभागाचे प्रमुख सुनील सोनावणे यांच्याकडे विचारणा केली असता, ‘आपल्याला अद्याप जी उत्तर विभागाचे पत्र मिळालेले नाही, बघावे लागेल’, असे उत्तर त्यांनी दिले. त्यामुळे मैदानाच्या परवानगीमागील गूढ वाढत आहे.

‘पालिका आयुक्तांवर दबाव’

‘दसरा मेळाव्याला शिवसेनेला मैदान मिळू नये, यासाठी पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांच्यावर मोठा दबाव आहे. मात्र, आयुक्तांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता शिवसेनेला मैदान दिले पाहिजे. पहिला अर्ज आमचा आला असून, परवानगी आम्हालाच मिळायला हवी’, असे माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. यापूर्वी विधी विभागाचा सल्ला मागितला जात नव्हता. यंदा हे नवीन काय आहे, असे पेडणेकर म्हणाल्या. तर ‘शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी बीकेसीतील मैदानासाठी अर्ज करण्यात आला होता. तो स्वीकारण्यात आला असून, आवश्यक भाडेही भरण्यात आले आहे. तर शिवसेनेला शिवतीर्थावर परवानगी देण्यास काय हरकत आहे. त्यांचा मेळावा बीकेसीत, आमचा शिवतीर्थावर होत असेल तर कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न येतोच कुठे’, असा प्रश्न वैद्य यांनी विचारला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.