मुंबई : दरवर्षी मोठ्या थाटात आणि उत्साहात पार पडणारा शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मात्र परवानगीच्या कात्रीत अडकला आहे. परंपरेप्रमाणे शिवतीर्थावर शिवेसेनेचा दसरा मेळावा पार पडतो मात्र यंदा महिनाभर उटलून गेल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही. याउलट कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, असं सांगत उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे अशा दोघांनाही मेळाव्यासाठी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे शिवसेनेने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज या विषयावर सुनावणी झाली. दोन्ही गटाने काही मुद्दे मांडले. कोर्टाने म्हणणं ऐकून उद्या पुन्हा सुनावणी होईल, असे निर्देश दिले. एकंदर दसरा मेळाव्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कंबर कसलेली असताना तिकडे सावरगावमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सुरु झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन मेळाव्याच्या तयारीसंदर्भात आपल्या समर्थकांना खास आवाहन केलंय.

शिवाजी पार्कवर यंदा दसरा मेळावा घेण्यास मुंबई महानगरपालिकेने कोणालाही परवानगी न देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवतीर्थावर दसरा मेळाव्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे अर्ज शिवसेनेतील दोन गटांकडून दाखल करण्यात आले होते. मात्र कोणत्याही एका गटाला ही परवानगी दिली गेल्यास या परिसरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली. त्यामुळे आम्ही दोन्ही अर्जदारांना परवानगी नाकारत आहोत, असं महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आलं. शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी द्यावी, यासाठी शिवसेनेने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उद्या त्यावर अंतिम सुनावणी होणार आहे. ठाकरेंना शिवाजी पार्कावर दसरा मेळावा घेता येणार की नाही? हे उद्याच निश्चित होईल. तत्पूर्वी तिकडे सावरगावमध्ये पंकजांच्या दसरा मेळाव्याची तयारी सुरु झाली आहे. समर्थकांना देखील त्यांनी खास आवाहन केलंय.

पंकजांनी चाहत्यांना काय आवाहन केलंय?

पंकजा मुंडे यांनी भक्तीगडावरील अपुर्ण राहिलेल्या कामांना गती दिल्याचा व्हिडिओ पोस्ट करत आपल्या समर्थकांना या मेळाव्याच्या तयारी लागा, असा संदेश दिला आहे. कोरोनामुळे अधुरे राहिलेले भगवानगडाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. त्या दिवसाच्या प्रतिक्षेत… तो दिवस आपला.. एक अनोखा दिवस… कोणता दिवस, कोणते स्थळ, आणि निमित्त काय??? तुम्हाला तर माहितीच आहे…लागा तयारीला, अशा शब्दांत त्यांनी आपल्या समर्थकांना संदेश दिला आहे.

गोपीनाथ मुंडे हयात असताना ते दसऱ्याला भगवान गडावर मेळावा घ्यायचे. त्यांच्या निधनानंतर भगवानगडाचा वापर राजकारणासाठी नको अशी भूमिका घेत पंकजांच्या मेळाव्याला विरोध केला गेला. आणि आता हा मेळावा गेल्या काही वर्षांपासून सावरगावच्या भगवान भक्तीगडावर घेतला जातो. गोपीनाथ मुंडे यांची मेळाव्याची परंपरा पंकजा मुंडे या समर्थपणे चालवत आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.