वॉर्नरने रचला इतिहास
खरे तर, ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. सध्या वॉर्नरपेक्षा सलामीवीर म्हणून जास्त शतके करणारा एकही खेळाडू नाही. वॉर्नरने ३४३ सामने आणि ४२८ डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर कसोटीत २५, वनडेत २० आणि टी-२० मध्ये १ शतक केले आहे म्हणजेच सलामीवीर म्हणून वॉर्नरच्या नावे एकूण आता ४६ शतके झाली आहेत. याआधी हा अप्रतिम विक्रम क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकरच्या नावावर होता, ज्याने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४५ शतके झळकावली होती. सचिनने ३४६ सामने आणि ३४२ डावांमध्ये ही कामगिरी केली.
दक्षिण आफ्रिकेचा १२३ धावांनी पराभव
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ८ विकेट गमावत ३९२ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नर (१०६), मार्नस लॅबुशेन (१२४), ट्रॅव्हिस हेड (६४) आणि जोश इंग्लिस (५०) यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव या धावसंख्येपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या डोंगराएवढ्या लक्ष्यासमोर दक्षिण आफ्रिकेला पूर्ण ५० षटकेही खेळता आली नाहीत आणि ४१.५ षटकांत २६९ धावा करून सर्वबाद झाला. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियाने १२३ धावांनी सामना जिंकला.