राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी सोमवारी तसे सूतोवाच केले. जिल्हाध्यक्ष फाळके यांच्यासोबत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे, माजी मंत्री, राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे सक्रीय झाले आहेत. आमदार रोहित पवार राज्यात फिरत असताना आता फाळके आणि तनपुरे या दोघांनी आता शरद पवार गटाची जिल्ह्यातील नवी संघटना बांधणीचेही नियोजन केले आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडून आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. या पार्श्वभूमीवर, शरद पवारांच्या गटातून अजित पवारांच्या गटात गेलेल्यांपैकी कोणी परत माघारी फिरते काय, याचा अंदाज घेण्यात आला आहे. त्यासाठी संबंधितांना पुरेशी संधीही देण्यात आली. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हाध्यक्ष फाळके यांनी बैठक घेतली.
यावेळी आ. तनपुरेंसह माजी आमदार दादा कळमकर, शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, महिला जिल्हाध्यक्ष योगीता राजळे उपस्थित होते. आढावा बैठकीस नगर तालुका, जामखेड, नेवासे, शेवगाव, पाथर्डी आणि राहुरी या सहा तालुक्यांचे तालुकाध्यक्ष तसेच जिल्हा कार्यकारिणीच्या ९० पदाधिकार्यांपैकी तब्बल ६० जण उपस्थित होते. याशिवाय सामाजिक न्याय, वकील, ग्रंथालय, ज्येष्ठ नागरिक, सांस्कृतिक, माजी सैनिक या सेलचे पदाधिकारीही उपस्थित होते. फक्त युवक-युवती सेवा दल पदाधिकारी नव्हते. जिल्हाध्यक्ष फाळके आणि आ. तनपुरे हे संयुक्तपणे सप्टेंबर अखेरपर्यंत जिल्हा दौरा करणार आहे. प्रत्येक तालुक्यात नव्याने संघटनाबांधणी करणार आहेत. शिवाय विधानसभा मतदारसंघ निहाय आढावा बैठकाही घेणार आहेत. त्यानंतर १० ते १२ ऑक्टोबरदरम्यान नवे पदाधिकारी निवड होणार आहे. शरद पवारांना दगाफटका करणार्या जिल्ह्यातील चार आमदारांविरुद्ध आक्रमक भूमिका घेणार असल्याचे फाळके यांनी जाहीर केले.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.