नवी दिल्ली: श्रीलंकेचा अँजेलो मॅथ्यूज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टाईम आऊट होणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याला टाईम आऊट घोषित करण्यात आला. मात्र ज्या परिस्थितीत मॅथ्यूज बाद झाला, त्यावरुन माजी क्रिकेचपटूंनी बांगलादेशचा कर्णधार शाकिब उल हसनवर टिकेची झोड उठवली आहे. बांगलादेशच्या कर्णधाराची कृती खेळभावनेच्या विरोधात असल्याचं मत अनेकांनी व्यक्त केलं.

एक फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाज खेळपट्टीवर येण्यासाठी आणि त्यानं चेंडूचा सामना करण्यासाठी निर्धारित वेळ असते. मैदानात येऊन त्याला ३ मिनिटांत चेंडूचा सामना करावा लागतो. तसं न घडल्यास आणि प्रतिस्पर्धी खेळाडूंनी त्याविरोधात अपील केल्यास पंच त्या फलंदाजाला बाद देऊ शकतात. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात अँजेलो मॅथ्यूज फलंदाजीसाठी मैदानात उतरला. पण त्याला चेंडूचा सामना करण्यासाठी वेळ लागला.
कोहलीचं ऐतिहासिक शतक, सगळ्यांकडून कौतुक; श्रीलंकेच्या कॅप्टनचं विधान ऐकून चाहते संतापले
मॅथ्यूज दोन मिनिटांच्या आत खेळपट्टीवर पोहोचला होता. पण त्याला पहिला चेंडू खेळण्यासाठी उशीर झाला. हेल्मेटची पट्टी तुटल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यानं राखीव खेळाडूकडे दुसरं हेल्मेट मागितलं. तो दुसरं हेल्मेट घेऊन आला. दरम्यान ३ मिनिटांचा अवधी होऊन गेला होता. बांगलादेशचा कर्णधार शाकिब उल हसननं पंचांकडे टाईम आऊटचं अपील केलं. पंचांनी ते स्वीकारलं आणि मॅथ्यूजला बाद ठरवण्यात आलं.

टीम इंडियाचा माजी सलामीवीर आणि विश्वचषक स्पर्धेतील समालोचक गौतम गंभीरनं मॅथ्यूजच्या विकेटवर सोशल मीडियावर भाष्य केलं. ‘दिल्लीत आज जे घडलं ते निराशाजनक होतं,’ असं गंभीरनं एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननंदेखील काहीशी अशीच प्रतिक्रिया दिली आहे. ‘हेल्मेटच्या कारणामुळे टाईम आऊट. हा नवा/वेगळा प्रकार आहे,’ असं वॉननं म्हटलं आहे.

ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू उस्मान ख्वाजानंदेखील यावर त्याचं मत मांडलं आहे. ‘एँजेलो मॅथ्यूज खेळपट्टीवर पोहोचला, तेव्हा त्याच्या हेल्मेटची पट्टी तुटली. हा प्रकार टाईम आऊट कसा? तो खेळपट्टीवर आला नसता, तर मी टाईम आऊटचं समर्थन केलं असतं. पण हा प्रकार पूर्णपणे हास्यास्पज आहे,’ असं ख्वाजानं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *