दिल्लीच्या सर्वात तरुण मुख्यमंत्री आतिशींंसह 5 मंत्र्यांचा शपथविधी:तिसऱ्या महिला नेतृत्वाचा मान
आम आदमी पार्टीच्या (आप) नेत्या आतिशी यांनी शनिवारी दिल्लीच्या आठव्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. नायब राज्यपाल व्ही.के. सक्सेना यांनी राजनिवास येथे त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. त्यांच्यासोबत ५ मंत्र्यांनीदेखील शपथ घेतली. अातिशी दिल्लीच्या सर्वात तरुण व तिसऱ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या. याआधी दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित, भाजपच्या सुषमा स्वराजही मुख्यमंत्री होत्या. स्वातंत्र्यानंतर आतिशी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे घेणाऱ्या १७ व्या महिला ठरल्या आहेत. छोटेखानी समारंभानंतर आतिशी आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या पाया पडल्या. नवीन मंत्रिमंडळात सौरभ भारद्वाज यांनी आधी शपथ घेतली. नंतर गोपाल राय, कैलाश गेहलोत, इम्रान हुसेन, मुकेश अहलावत यांनी शपथ घेतली. फेब्रुवारीत निवडणूक आतिशींकडे अर्थ, सार्वजनिक बांधकाम खाते, शिक्षण, ऊर्जेसह १३ खाती असतील. भारद्वाज शहरी विकास, आरोग्यसह ८ खाती. गोपाल राय- पर्यावरण, सामान्य प्रशासन, गहलोत – परिवहन, महिला व बाल विकास, हुसेन – अन्न पुरवठा आणि अहलावत यांच्याकडे श्रम व रोजगार खाते दिले. फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक होईल. आतिशींकडे फक्त ३ महिने आहेत. त्यानंतर आचारसंहिता लागेल. केजरीवालांना पुन्हा मुख्यमंत्री करणे हेच आमचे उद्दिष्ट आतिशी म्हणाल्या, ‘आपण सर्व दोन कोटी दिल्लीकरांनी मिळून एकच काम केले पाहिजे. फेब्रुवारीत केजरीवाल यांना पुन्हा मुख्यमंत्री करायचे आहे. दिल्लीतील लोकांनी त्यांना मुख्यमंत्री केले नाही तर भाजप मोफत वीज योजना बंद करेल. सरकारी शाळांची दुरवस्था होईल. मोहल्ला क्लिनिक बंद होतील. रुग्णालयांतील उपचार बंद होतील. महिलांचा मोफत प्रवास बंद होईल. भाजप एक-दीड वर्षापासून दिल्लीला त्रस्त करत आहे.’