Devendra Fadnavis Slams Ajit Pawar: येत्या आठवडाभरात १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. आम्ही जुन्या सरकारसारखं केंद्र सरकार मदत देईल तर करू, असं वागणार नाही. केंद्र सरकारला मदतीसाठी प्रस्ताव जरूर जाईल. पण त्यांच्या मदतीची वाट न पाहता शिंदे साहेबांच्या नेतृत्त्वाखालील सरकार शेतकऱ्यांना राज्याच्या तिजोरीतून मदत देईल, असे फडणवीस यांनी म्हटले.

 

Ajit Pawar Devendra Fadnavis (2)
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस

हायलाइट्स:

  • केंद्र सरकारला मदतीसाठी प्रस्ताव जरूर जाईल
  • पण त्यांच्या मदतीची वाट पाहत बसणार नाही
  • सरकार शेतकऱ्यांना राज्याच्या तिजोरीतून मदत देईल
मुंबई: राज्यातील अतिवृष्टी झालेल्या भागांमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी करणारे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगलेच फटकारले. आमचं सरकार तुमच्या सरकारसारखं नाही. तुमच्या सरकारच्या काळात मी सभागृहात वाचून दाखवलं होतं, दुष्काळ असो, ओला दुष्काळ असो किंवा एखादं चक्रीवादळ असो, सात-सात महिने त्यांच्या सरकारच्या काळात मदत मिळाली नाही. आमचं सरकार ती मदत तात्काळ करेल. आम्ही जुन्या सरकारप्रमाणे केंद्र सरकार मदत देईल तर आम्ही करू, असे म्हणणार नाही, असा टोला देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला. ते गुरुवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
Sanjay Raut: संजय राऊतांवर बोलायला मला वेळ नाही, आमच्या पक्षातील छोटे प्रवक्ते बोलतील: फडणवीस
यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तार रखडल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मदत मिळण्यात विलंब होत असल्याचा आरोप फेटाळून लावला. कालच माननीय मुख्यमंत्री आणि मी याचा आढावा घेतला. अतिवृष्टीग्रस्त भागातील शेतीचे जवळपास ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये रोज १० टक्क्यांची वाढ होत आहे. त्यामुळे येत्या आठवडाभरात १०० टक्के पंचनामे पूर्ण होतील. त्यानंतर आमचे सरकार शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करेल, असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारही लवकरच होईल. परंतु, तोपर्यंत कोणतेही काम अडून राहणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.
अजित पवारांनी बांधावर जात शेतकऱ्यांचे अश्रू पुसले; सरकारला सवाल, ‘… जगायचे कसे?’
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. त्यांनी आज चंद्रपूरमधील अतिवृष्टीग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी त्यांनी राज्यातील नेत्यांनी एकमेकांचा उणीदुणी काढायची सोडून अतिवृष्टी झालेल्या भागातील जनतेला मदत देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे म्हटले. राज्य सरकारने मंत्रिमंडळ आणि पालकमंत्री नेमलेले नाहीत. त्यामुळे राज्यात पूरपरिस्थिती आणि ओला दुष्काळ असताना शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही नाही, असा आरोप अजित पवार यांनी केला होता.

९१ नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात पुन्हा फेरविचार याचिका दाखल करु: फडणवीस

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी ९१ नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी कोर्टात पुन्हा फेरविचार याचिका दाखल करु, असे सांगितले. मागच्या तारखेला सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण देण्यास मंजुरी दिली होती. पण त्यामध्ये अगोदरच निवडणुका जाहीर झालेल्या ९१ महानगरपालिकांचा समावेश नव्हता. त्यामुळे राज्यातील इतर नगरपालिका आणि महानगरपालिकांप्रमाणे ९१ नगरपालिकांमध्येही ओबीसी आरक्षण लागू झाले पाहिजे, अशी भूमिका आम्ही न्यायालयात मांडली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही भूमिका फेटाळून लावली. त्यांनी असे का केले हे माहिती नाही. कारण कायद्यानुसार सर्व नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू झाले पाहिजे. त्यामुळे आता आम्ही न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करू. सध्या ४०० स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी ९१ तर २९ हजार पैकी केवळ २७० ग्रामपंचायतींमध्येच ओबीसी आरक्षण लागू नाही, याकडे देवेंद्र फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Leave a Reply

Your email address will not be published.