मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पोलीस भरतीच्या मुद्द्यावरून आक्रमक झालेल्या तरुणांच्या घोषणाबाजीचा नांदेडमध्ये सामना करावा लागला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांच्या मागणीचं निवेदन देखील स्वीकारलं. नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडून दाखवणाऱ्या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आल्यानंतर हा गोंधळ झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या समोर आक्रमक घोषणाबाजीचा करणाऱ्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचंही पाहायला मिळालं. मात्र, राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्था पाहणाऱ्या पोलीस दलात जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट गृहमंत्र्यांसमोर आंदोलन करण्याची वेळ का आली हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

महापरीक्षा पोर्टलविषयी विद्यार्थ्यांमधील साशंकता, आरोग्य भरती मधील गोंधळ, म्हाडाच्या भरतीमध्ये नव्यानं घ्यावी लागलेली परीक्षा, टीईटी घोटाळ्यामुळं निर्माण झालेला असंतोष आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा उत्तीर्ण होऊनही नियुक्ती मिळण्यात होणारी दिरंगाई, पोलीस भरती विषयी पसरवल्या जाणाऱ्या चर्चा, वाढती बेरोजगारी अशी अनेक कारणं विद्यार्थ्यांसमोर आहेत. काल प्राध्यापक भरतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली. आज पोलीस भरतीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी निवेदन देत आवाज उठवला. राज्यातील राजकीय सर्व पक्षीय नेते नोकरी, रोजगाराच्या मूलभूत प्रश्नावर आवाज उठवण्यास अपयशी ठरलेत का? असा प्रश्न यानिमित्तानं उपस्थित होतं आहे.

नांदेडमध्ये देवेंद्र फडणवीसांसमोर तरुणांची आक्रमक घोषणाबाजी; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

२०१९ ची पोलीस भरती प्रक्रिया बराच वेळ चालली

राज्यातील सर्वाधिक विश्वासार्ह अशी भरती प्रक्रिया म्हणून विद्यार्थी, तरुण पोलीस भरतीकडे पाहत होते. २०१९ मध्ये विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टलविषयी आक्षेप नोंदवले होते. महापरीक्षा पोर्टल बंद करण्याची मागणी देखील विद्यार्थी संघटनांनी केली होती. नोव्हेंबर २०१९ च्या दरम्यान पोलीस भरती जाहीर झाली होती. जानेवारी २०२० मध्ये विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेण्यात आले. नंतर, आलेल्या करोना संसर्गाच्या संकटामुळं पोलीस भरती प्रक्रिया देखील लांबणीवर पडली.

महाराष्ट्रात पोलीस भरतीची जाहिरात ज्यावेळी जाहीर झाली त्यावेळी जाहिरातींमध्ये एसीईबीसी प्रवर्गातून मराठा आरक्षण होतं. सुप्रीम कोर्टानं ऑक्टोबरमध्ये २०२० मध्ये मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठानं मराठा आरक्षण रद्द केलं. त्यामुळं पोलीस भरतीमध्ये मराठा आरक्षणासाठी राखीव असलेल्या जागा निरस्त करण्यात आल्या.

वेदांता फॉक्सकॉनवरून आदित्य ठाकरेंनी फडणवीसांना सुनावले, ‘महाराष्ट्र पाकिस्तान आहे का…’

पोलीस भरतीच्या स्वरुपाबद्दल तर्क वितर्क

महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस भरती २०१९ पूर्वीपर्यंत प्रथम शारीरिक क्षमता चाचणी आणि नंतर लेखी परीक्षा अशा स्वरुपानं व्हायची. २०१९ मध्ये हे स्वरुप बदलण्यात आलं, पहिल्यांदा लेखी परीक्षा घेण्यात आली आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्यात आली. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परत एकदा पोलीस भरतीच्या स्वरुप बदलेल अशा चर्चा सुरु आहेत त्यामुळं संभ्रम वाढताना दिसतोय.

पोलीस भरती कधी जाहीर होणार याबाबत संभ्रम

२०१९ ची पोलीस भरती प्रक्रिया करोना संसर्गामुळं लांबली. ती भरतीप्रक्रिया काही महिन्यांपूर्वी पूर्ण झाली आहे. २०१९ नंतर नवी पोलीस भरती जाहीर झालेली नाही. राजकीय नेत्यांकडून वेळोवेळी पोलीस भरती करणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळं पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सतत संभ्रमाचं वातावरण निर्माण होते.

पोलीस भरतीसाठी ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर तयारी करत असतात. बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आणि वयाची १८ वर्ष पूर्ण असतील तर विद्यार्थी पोलीस भरतीसाठी पात्र ठरतो. कमी वयात सरकारी नोकरीची हमी असल्यानं विद्यार्थी- विद्यार्थिनी भरतीची तयारी करत असतात. नवी पोलीस भरती जाहीर व्हायला वेळ लागत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये असंतोष असल्याचं आज दिसून आलं.

डोकंच चक्रावून गेलं! मृत्यूनंतर तेराव्याची तयारी सुरू होती, एक दिवस आधी तरुण जिवंत परत आला

आरोग्य भरतीमधील गोंधळ, टीईटी घोटाळ्यामुळं असंतोष

करोना संसर्गाचं संकट राज्यात असताना आरोग्य भरती जाहीर झाली. आरोग्य भरती आयोजित करणाऱ्या कंपनीनं घातलेला गोंधळ, काही जणांना गैरप्रकाराबद्दल करण्यात आलेली अटक, परीक्षेतील गोंधळ यामुळं विद्यार्थ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. म्हाडा परीक्षा होण्यापूर्वीच पुणे पोलिसांनी काही जणांना केलेली अटक त्यामुळं परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली. पुन्हा म्हाडाची परीक्षा ऑनलाईन पद्धतीद्वारे घेण्यात आली. आरोग्य भरती घोटाळ्याचा तपास करताना पुणे पोलिसांना टीईटी घोटाळ्याची लिंक लागली. पुणे पोलिसांनी त्या प्रकरणी अनेकांना अटक देखील केली. महापरीक्षा पोर्टलमुळं नाराज असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या परीक्षांमधील गोंधळामुळं असंतोष वाढू लागला होता.

मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद येथील कार्यक्रमात काल राज्यातील रखडलेली प्राध्यापक भरती करण्यात यावी, यासाठी विद्यार्थ्यांनी घोषणा दिल्या. देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत, विद्यार्थ्यांनी त्यांच्याकडे पोलीस भरती करण्याची मागणी केली आहे. नोकरी आणि रोजगाराच्या मुलभूत प्रश्नावर सर्वपक्षीय नेते आवाज उठवतील ही अपेक्षा पूर्ण न झाल्यानं विद्यार्थी स्वत:च आवाज उठवू लागल्याचं चित्र आहे.

२०१९ ची पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून निवड झालेल्या उमेदवारांचं प्रशिक्षण सुरु आहे. आता नव्यानं स्थापन झालेलं राज्य सरकार पोलीस भरती जाहीर करेल ही अपेक्षा तरुणाई बाळगतेय. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच औरंगाबादला स्वातंत्र्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षात ७५ हजार पदांची शासकीय नोकर भरती करणार असल्याची घोषणा केलीय, ती लवकरच प्रत्यक्षात उतरायला हवी, असं तरुणांना वाटतंय.

कोल्हापुरात शिंदे – ठाकरे गटातील संघर्ष पेटला, इंगवलेंची क्षीरसागर यांच्या विरोधात फिर्यादSource link

Leave a Reply

Your email address will not be published.