मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुंबईतील गोरेगाव भागातील नेस्कोच्या मैदानावर आयोजित शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी अशा सगळ्यांचाच समाचार घेतला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, असं म्हणत ठाकरेंनी दंड थोपटले.

देवेंद्र फडणवीस बोलले की त्यांच्या आयुष्यातील ही शेवटची निवडणूक, होय, तुमच्या आयुष्यातील ही शेवटचीच निवडणूक आहे. मग तुम्ही विचाराल आपलं काय, तर मी म्हणेन, की आपल्या आयुष्यातील ही पहिलीची निवडणूक आहे असं समजून लढा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काही दिवसांपूर्वी अमित शाह यांच्या उपस्थितीत मुंबईत झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात ‘ही शेवटची निवडणूक आहे असं समजून लढा’ असं आव्हान फडणवीसांनी कार्यकर्त्यांना केलं होतं, त्यावरुनच ठाकरेंनी थेट नाव घेत निशाणा साधला.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आज वेदांता गेला, त्यावर धादांत खोटं बोलत आहेत. लाज वाटली पाहिजे. कोणाची बाजू घेऊन कोणाशी भांडताय? आमच्यामुळे गेला की तुमच्यामुळे, अरे पण गेला ना, का नाही आणत? चला आम्ही तुमच्या सोबत राहतो, विरोधीपक्ष आणि सत्ताधारी पक्ष एकत्र येऊ आणि गेलेला वेदांता परत आणू, चला मी तुमच्यासोबत येतो, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिंदेंना केलं.

मिंधे गट नुसता शेपट्या घालून आहे. आज दिल्लीत गेलेत, दिल्लीत मुजरा, महाराष्ट्रात गोंधळ. हिंमत असेल तर दिल्लीत जाऊन पंतप्रधानांना सांगा की आमचा प्रकल्प परत द्या, वेदांताला केंद्र सरकार आणखी सवलती द्यायचा प्रयत्न करत आहे, म्हणजे हे आधीच ठरलं होतं, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

संजय राऊत मिंधे गटात गेले की काय, अशी चर्चा सुरु होईल. संजय राऊत मोडेन पण वाकणार नाही, या निश्चयाने लढत आहेत. तलवार हातात घेऊन पुढे आहेत. मुलं पळवणारी टोळी ऐकलेय, पण बाप पळवणारी औलाद महाराष्ट्रात आलेय. सत्तेचं दूध पाजलं, पण त्यांच्या तोंडाची गटारं उघडी पडलीत. मुंबईवर लचके तोडणाऱ्या गिधाडांची औलाद फिरतेय, निजामशाह, आदिलशाह यांच्या कुळातील आताचे अमित शाह. ते देशाचे गृहमंत्री आहेत, पण मुंबईत येऊन काय म्हणाले तर उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा. पण त्यांना तुम्ही आसमान दाखवा. ही नुसती गवताची नाही तलवारीची पाती आहे. मुंबई तुमच्यासाठी स्क्वेअर फुटातील जमीन असेल, आमची ही मातृभूमी आहे, असं उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं.

हेही वाचा : मिंधे गट, गिधाडं, कमळाबाई, २५ वर्ष युतीत सडल्याचा पुनरुच्चार, उद्धव ठाकरेंचा चौफेर हल्लाबोल

ही मुंबादेवी आहे, जो आमच्यावर वार करायला येईल, त्याचा कोथळा काढल्याशिवाय राहणार नाही. मुंबईच्या वडापावचा ठेचा जास्त झाला का, की इतके लांब ढोकळा खायला गेलात. पुन्हा दसरा येतोच आहे, जी काढायची ती लक्तरं काढणारच आहे. आज मुद्दाम मुंबईवर बोलणार आहे. कमळाबाई आणि मुंबईचा संबंध काय? कमळाबाई पहिल्यांदा बोललो, हा शब्द बाळासाहेबांनी दिलाय, ही तीच शिवसेना आहे. पुन्हा मुंबईवर हक्क सांगण्याचं धाडस करु नका. माझ्यावर वंशवादावरुन टीका होते, मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात जनसंघ कुठे होता? माझे आजोबा होते, त्यांना शेलार मामा म्हणायचे, आताचे शेलार मामा नाहीत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.

२५ वर्ष युतीत सडली, पुन्हा बोलतोय. ही नालायक माणसं जोपासली, मेहनत तुमची, हक्क हे सांगायला लागले. महापौर आमचा, मग उपमहापौर भाजपचा. स्टँडिंग आम्हाला तर ती तुम्हाला. वरती पोहोचलात नि आम्हाला लाथा मारायला लागलात, अशी टीकाही उद्धव ठाकरेंनी केली.

हेही वाचा : वेदांतांवरुन उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, लाज वाटली पाहिजे, कोणाची बाजू घेऊन भांडताय?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.