धनंजय मुंडे, वाल्मीक कराडमुळे पंकजा मुंडेंचा पराभव:सुरेश धस यांचा आरोप, म्हणाले – त्यांनाही हे माहीत, पण त्या बोलू शकत नाही
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडाप्रकरणी धनंजय मुंडे अडचणीत सापडलेत. या हत्याकांडात त्यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांचा हात असल्याचा आरोप होत आहे. त्यातच आता भापजचे आष्टीचे आमदार यांनी पंकजा मुंडेंच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्यामुळेच पंकजा मुंडे लोकसभा निवडणुकीत पडल्या, असा दावा सुरेश धस यांनी केला. मात्र, पंकजा मुंडे यांनी या पराभवासाठी आम्हाला जबाबदार ठरवल्याचे ते म्हणाले. पंकजा मुंडे यांचा पराभव हा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडच्या दहशतीमुळे आणि त्यांच्या वागण्यामुळे झाला. वाल्मीक कराडची परळीत दहशत आहे. धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडमुळे अनेकजण पंकजा मुंडेंवर नाराज झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसून आला. पंकजा मुंडेंना माझ्या मतदारसंघातून 31 हजारांचे तर परळीमधून 73 हजारांचे लीड मिळाले. मात्र, एकट्या बीड तालुक्यातून त्या 98 हजारांनी मागे पडल्या, असे सुरेश धस यांनी टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले. … तर पंकजा मुंडेंचा पराभव झाला नसता
वाल्मीक कराडने धनंजय मुंडेंना एकही मित्र ठेवला नसल्याचे सुरेश धस म्हणाले. एकवेळ बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे मित्र होते. वाल्मीक कराड आणि विष्णू चाटेमुळे बजरंग सोनावणे हे धनंजय मुंडेंपासून वेगळे झाल्याचे ते म्हणाले. विष्णू चाटेला तालुका अध्यक्ष करायची गरज काय होती? असा सवाल करत बजरंग सोनवणेसारखा तगडा उमेदवार समोर उभा राहिल्यानेच पंकजा यांचा पराभव झाला. ते बाजूला गेले नसते, तर पंकजा मुंडे कधीच पडल्या नसत्या, असा दावाही धस यांनी केला. म्हणून माझ्या विरोधात उमेदवार दिला
पुढे बोलतान सुरेश धस म्हणाले, पंकजा मुंडेंना हे सर्व माहिती आहे. पण त्या थेट बोलू शकत नाही. म्हणून मी हे बोलतोय. आम्ही प्रामाणिक काम केले. पण लोकसभेच्या पराभवाला आम्हाला जबाबदार ठरवण्यात आले. त्यामुळेच पंकजा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीला आमच्याविरोधात उमेदवार दिला.