धनंजय मुंडे वाल्मीक कराडला वाचवत आहेत:राजीनामा दिलाच पाहिजे, भाजप नेते नरेंद्र पाटील यांचा घरचा आहेर

भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी सकाळी पत्रकार परिषद घेत मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. धनंजय मुंडे हे खंडणी प्रकरणात गुन्हेगार नाहीत हे मी 100 टक्के खात्रीने सांगतो, असे ते यावेळी म्हणाले आहेत. यावरून अनेक नेत्यांनी आता प्रतिक्रिया देण्यास सुरू केले आहे. भाजप नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी धनंजय मुंडे यांना घरचा आहेर दिला आहे. धनंजय मुंडे यांना घरचा आहेर देताना नरेंद्र पाटील म्हणाले, एवढे सर्व प्रकरण झालेले असताना धनंजय मुंडे हे कराडच्या परळी येथील कार्यालयात जाऊन गाठीभेटी घेत होते. याचा अर्थ धनंजय मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला आहे. तसेच धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पत्रकारांशी संवाद साधताना नरेंद्र पाटील यांनी आमदार सुरेश धस तसेच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचे समर्थन केले आहे. नरेंद्र पाटील म्हणाले, अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या दोघांचीही मागणी योग्य आहे. आपला सहकारी किंवा पार्टनर एखाद्या प्रकरणात अडकला असेल तर मुंडे यांनी लगेच बाजूला व्हायला हवे होते, असा सल्ला देखील नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर देखील धनंजय मुंडे हे परळीमध्ये जाऊन कराडच्या कार्यालयात गाठीभेटी देत आहेत. याचा अर्थ मुंडे हे वाल्मीक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळेच अंजली दमानिया आणि सुरेश धस यांनी राजीनाम्याची केलेली मागणी अतिशय रास्त आहे, असेही नरेंद्र पाटील म्हणाले. पुढे बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्यावर कुठलाही दबाव राहणार नाही. चौकशी चांगल्या पद्धतीने होईल. पारदर्शक होईल. तसेच या प्रकरणातील सत्यही बाहेर पडेल. सत्य बाहेर आल्यावर आणि निर्दोष असेल तर धनंजय मुंडे यांनी खुशाल परत मंत्रिपदाची शपथ घ्यावी. पहाटे, संध्याकाळी, सकाळी आणि दुपारी केव्हाही शपथविधी होतच असतो. त्यामुळे एका मंत्र्यासाठी पुन्हा शपथविधी होऊ शकतो, असा तोला नरेंद्र पाटील यांनी लगावला आहे. चौकशीमध्ये जर धनंजय मुंडे यांच्या नावाचा उल्लेख होत असेल तर त्यांनी पदापासून अलिप्त राहावे. त्यांच्या राजीनाम्याने फायदा होईल की नुकसान होईल हे पाहू नये. कॅबिनेट मंत्र्यांचा हा जिल्हा आहे. तसेच त्यांच्या निकटवर्तीयांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणेवर दबाव आहे. पोलिसांच्या तक्रारीही येत आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी काही वेळासाठी अलिप्त राहिले पाहिजे. सरकार त्यांचेच आहे. अजितदादांनी एवढी मोठी पाठराखण केली आहे. एक दोन महिन्याचा प्रश्न आहे. एकदा का तपास पूर्ण झाला तर पुन्हा शपथविधी घ्या. कुणी अडवले आहे? असा सवाल नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलताना नरेंद्र पाटील म्हणाले, धनंजय मुंडे आणि महंत यांच्यात नेमकी काय चर्चा झाली आहे हे त्या दोघांनाच माहीत आहे. मात्र, महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांना निर्दोष सिद्ध करून एक प्रकारी क्लीनचीट दिली आहे. कुणाला क्लीनचिट द्यायची आणि नाही हा महंतांचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण तपास यंत्रणा याचा तपास करतीलच, हा मला ठाम विश्वास आहे.