धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव कुठे आहे?:पंकजा मुंडे यांचा सवाल, नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर अधिकचे बोलणे टाळले

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीड जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची एकप्रकारे पाठराखण करत आपली भूमिका मांडली होती. त्यामुळे एकच वादंग उठले होते. नामदेव शास्त्री यांच्या भूमिकेवर पंकजा मुंडे यांनी बोलण्यास नकार दिला. तर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा दबाव कुठे आहे? अस सवालही त्यांनी केला. धनंजय मुंडेंवर राजीनाम्याचा दबाव असल्याचे वाटत नाही. अजित पवार हे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर निर्णय घेतील, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे या जालन्याच्या पालकमंत्री आहेत. त्यांच्या उपस्थितीत आज जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी नामदेव शास्त्रींची भूमिका आणि धनंजय मुंडेंची पाठराखण यासंदर्भात पंकजा मुंडेंनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. नेमके काय म्हणाल्या पंकजा मुंडे?
मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी स्वतः विषय अजून तसा धनंजयकडे केला नाही. त्यामुळे मला कळत नाही, दबाव कुठे आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी कुठेही दबाव नाही. कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याच्यामध्ये काही संबंध आढळला तर कारवाई करू. पण जर काही संबंध आढळला नाही, तर अन्याय नको. अशी त्यांची भूमिका आहे. याबद्दल सर्वसर्वी मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. तपास यंत्रणा जो काही पुरावा देईल, त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय निर्णय घेईल. यावर सगळे अवलंबून आहे. मुळात सगळ्या गोष्टी तपास यंत्रणांवर अवलंबून आहे, असे सांगत या प्रकरणात संबंध आढळून आल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, असे पंकजा मुंडे म्हणाल्या. नामदेव शास्त्रींच्या भूमिकेवर बोलणे टाळले
नामदेव शास्त्रींनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली असून त्यांच्या समर्थनार्थ भक्कपणे पाठिशी असल्याचेही त्यांनी म्हटले. यासंदर्भात पंकजा मुंडेंना विचारले असता, ‘ती त्यांची भूमिका आहे, त्यावर मी भूमिका व्यक्त करण्याची आवश्यकता वाटत नाही, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी जास्त बोलणे टाळले. व्यक्त होणे ही फक्त बातमी होते
सरपंच संतोष देशमुख यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करणार असल्याचे नामदेव शास्त्री यांनी जाहीर केले आहे. तर धनंजय देशमुख हे भगवान गडावर जाणार आहेत, यावरही बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी काही प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. आता नामदेव शास्त्री यांनी काय म्हटले, ते मी ऐकले नाही. ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. त्यावर मी व्यक्त व्हावे, अशी काही आवश्यकता नाही. सर्वसर्वी त्यांची भूमिका आहे. प्रत्येक व्यक्तींच्या विधानावर व्यक्त होणे ही फक्त बातमी होते, बाकी काही होत नाही.