धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा?:अजित पवारांची आज पत्रकार परिषद, अमित शहांच्या भेटीनंतर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष

धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा?:अजित पवारांची आज पत्रकार परिषद, अमित शहांच्या भेटीनंतर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राज्यात वातावरण तापले असून वादंग उठले आहे. या हत्याकांडात संशयाची सुई मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड यांच्यावर जात असल्याचा आरोप होत आहे. विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. यामुळे सरकारवर दबाव वाढत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड सध्या देशाच्या पातळीवर चर्चेत आले आहे. या प्रकरणात वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. आरोपी वाल्मीक कराड धनंजय मुंडे यांच्या जवळचे असल्याने मुंडे यांच्या मंत्रीपदाचा राजीनामा मागितला जात आहे. तसेच महायुतीच्या सरकारवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची देखील सुरुवातीपासून नजर आहेच. त्यामुळे आता अमित शहा यांनी या प्रकरणी अजित पवारांकडून माहिती घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंत सरपंच हत्या प्रकरण आणि धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर मौन बाळगले होते. मात्र, बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर आज ते पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे त्यांच्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. अजित पवार हे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार की, त्यांची बाजू घेणार हे आता आजच्या पत्रकार परिषदेत समजेल. एकंदरीत संतोष देशमुख हत्या प्रकरण धनंजय मुंडे यांच्या चांगलेच अंगलट येत असल्याचे दिसत आहे. मुंडेंनी घेतली होती अजित पवारांची भेट सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्या जवळचे लोक अडकले आहेत. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी नैतिकेच्या आधारावर राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून मागणी होत आहे. या प्रकरणी सर्वपक्ष मंडळाने देखील राज्यपाल यांची भेट घेतली होती. राज्यपालांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणी या मंडळाने केली होती. सर्वपक्ष मंडळाने राज्यपालांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर मुंडे यांनी मंत्रालयात जावून अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीत धनंजय मुंडे आणि अजित पवार यांच्यात एक तास चर्चा झाली. पण त्याचा तपशील बाहेर आला नव्हता. अजितदादांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष
उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या सोमवारच्या भेटीनंतर राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा दिल्याचा दावा केला जात होता. पण दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीसाठी पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांनी स्वतःच आपण राजीनामा वगैरे काहीही दिला नसल्याचे स्पष्ट केले. विशेषतः अजित पवार यांनी यासंबंधी धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप सिद्ध होईपर्यंत त्यांचा राजीनामा घेणार नसल्याची भूमिका घेतल्याचीही माहिती आहे. त्यामुळे सर्वांचे अजित पवारांच्या आजच्या पत्रकार परिषदेकडे विशेष लक्ष लागून आहे. धनंजय मुंडें यांनी सोमवारी भेट घेतल्यानंतर अजित पवार लगेचच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर पोहोचले होते. फडणवीस आणि अजित पवार यांच्यात अर्धा तास चर्चा झाली होती. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत समजू शकले नसले, तरी या गाठीभेटीच्या अनुषंगाने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर सरकारकडून विचार होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. सरपंच हत्याकांडाला 1 महिना पूर्ण
दरम्यान, बीडच्या सरपंच हत्याकांडाला आज बरोबर एक महिना झाला. या महिन्याभरात पोलिसांनी या हत्ये प्रकरणी 6 प्रमुख आरोपींना अटक केली. विरोधकांनी या प्रकरणी ज्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे, त्या वाल्मीक कराडलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहे. पण त्याच्यावर केवळ खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाल्मीक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असून यामुळे त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment