धनंजय मुंडेंकडून राजीनाम्याची तयारी:मग अजित पवार, देवेंद्र फडणवीसांना कशाची प्रतीक्षा; दिल्ली दरबारी निर्णय होणार का?

राज्यात महायुतीची सत्ता आल्यापासून धनंजय मुंडे हे सर्वाधिक चर्चेत आलेले मंत्री ठरले आहेत. केवळ विरोधी पक्षच नाही तर महायुतीतील घटक पक्षाच्या नेत्यांकडून देखील धनंजय मुंडे यांच्या राजीनामाची मागणी केली जात आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र, असे असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राजीनामा का घेत नाहीत? असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संदर्भात आता दिल्ली दरबारी निर्णय होणार आहे का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यातच त्यांच्या राजीनामांसाठी सरकार वरील दबाव वाढत आहे. या दरम्यान काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीत देखील आमदारांसमोर त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. पक्ष आणि अजित पवार यांनी आदेश दिला तर आपण लगेच राजीनामा देण्यास तयार असल्याचे मुंडे यांनी सांगितले आहे. मात्र, अजित पवार हेच माझे विषयी काय करायचे हे ठरवतील, असे देखील मुंडे यांनी म्हटले आहे. तर धनंजय मुंडे यांनी वैयक्तिक काहीजण आपल्याविषयी राग ठेवत असल्याचा आरोप केला आहे. अजित पवार यांनी देखील स्पष्ट केली भूमिका धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांसमोर भूमिका स्पष्ट केली आहे. सामाजिक कार्यकर्त्यां अंजली दमानिया यांच्या भेटीची माहिती देखील अजित पवार यांनी सर्व आमदारांना दिली. तसेच दमानिया यांनी दिलेली सर्व कागदपत्रे आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिली असल्याचे देखील अजित पवार यांनी आमदारांच्या बैठकीत सांगितले. यानंतर माध्यमांशी बोलताना देखील अजित पवार यांनी दोषी आढळल्यास कोणाचेही हयगय केली जाणार नाही. प्रत्येकावर कारवाई केली जाईल, असे सांगितले. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना देखील दोषी आढळल्यानंतरच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यावर वाल्मीक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यामुळे राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत सापडलेत. राज्यात त्यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढला असताना ते दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात ते केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची भेट घेणार आहेत. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीला जाणार असल्यामुळे राष्ट्रीय राजधानीत मुंडेंच्या राजीनाम्यावर खल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अंजली दमानियांनी घेतली होती अजित पवारांची भेट बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा वाल्मीक कराडला अटक करण्यात आली आहे. मात्र आता धनंजय मुंडे यांचा देखील राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी केली जात आहे. याच संदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरि बंगल्यावर जाऊन भेट घेतली आहे. अंजली दमानिया यांनी सर्व पुरावे अजित पवारांना दाखवले आहे. सर्व पुरावे बारकाईने बघून अजित पवार यांनी मंगळवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घेईल, असे अजित पवार यांनी आश्वासन दिले असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या – अंजली दमानिया या संदर्भात सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या होत्या की, धनंजय मुंडे दोषी नसते तर आम्ही कारवाईची मागणी केलीच नसती. तेवढी अक्कल आम्हालाही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मित्र म्हणून त्यांची पाठराखण करायची असेल तर त्यांनी एक भान ठेवावे की जनता चिरडत हा माणूस तिथे मोठा होत आहे. मित्र असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्याचे तुमचे कर्तव्य आहे. सुरेश धस यांनी वाल्मीक कराड यांच्या ऑडिओ क्लिपवर काही मोठा खुलासा करणार असतील तर त्यांनी तो लवकरात लवकर करावा. त्यांचे स्वागत असल्याचेही दमानिया यांनी म्हटले आहे. दमानियांनी पुरावे कोर्टात सादर करावे- प्रा. हाके ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी म्हटले होते की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडे काही पुरावे असतील त्यांनी ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्याऐवजी न्यायालयामध्ये सादर करावे. त्यावर कारवाई होईल, अशा शब्दात ओबीसी आरक्षणाचे नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी दमानिया यांना आव्हान दिले. अंजली दमनिया या केवळ राजीनामे मागत असल्याचे हाके यांनी म्हटले. या प्रकरणात अंजली दमानिया असो किंवा क्षीरसागर असो, या सर्वांनी कोणाकडून तरी सुपारी घेतली आहे, असा आरोप देखील प्रा. हाके यांनी केला आहे.