धनंजय मुंडेंना काढून छगन भुजबळांचा मंत्रिमंडळात समावेश:विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा; राजकीय चर्चा रंगली
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या बीड मधील प्रकरणावरून काहीही बोलत नाहीत. त्यांचे मौन पाहता मुंडेंची विकेट काढली जाऊ शकते, अशी शक्यता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. मुंडे यांची विकेट काढून टीम मध्ये छगन भुजबळ यांचा समावेश करण्याची शक्यता किंवा विचार अजितदादांच्या डोक्यात आहे का? असा प्रश्न गेल्या चार-पाच दिवसापासून आम्हाला पडत असल्याचे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत. त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील वाढत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगून मंत्रिमंडळात स्थान न मिळालेल्या छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळेच छगन भुजबळ यांना यामध्ये कदाचित वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी लागणार असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. भाजप त्यांना ओबीसीचा देशपातळीवर नेता करेल छगन भुजबळ यांच्या बाबत अजित पवार निर्णय घेतील. नसता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दुसरा पर्याय आहेच, असा दावा देखील वडेट्टीवार यांनी केला आहे. भुजबळ आणि फडणवीस यांच्या भेटीमध्ये काहीतरी झालेच असेल. देशाचा ओबीसीचा नेता त्यांना भाजप करेल, अशी शक्यता देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे. बीड येथील प्रकरणावरून विविध पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामाची मागणी करत आहेत. मंत्रिमंडळात ही जागा रीक्त झाल्यावर त्या जागी छगन भुजबळ यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावरुन वडेट्टीवार यांनी ही शक्यता वर्तवली आहे. या संदर्भातील खालील बातमी देखील वाचा…. छोट्या ‘आका’चे एन्काउंटर होऊ शकते:विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली भीती; मोठ्या ‘आका’ला वाचवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा मोठ्या आकाला वाचवण्यासाठी लहान आकाचा एन्काऊंटर होऊ शकतो, अशी आमच्याकडे माहिती असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. मोठ्या आकाला वाजवण्यासाठी, पुरावा नष्ट होण्याची शक्यता विश्वासनीय उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी माझ्याशी बोलताना व्यक्त केली. वाल्मीक कराडचे सध्या पोलिस कोठडीमध्ये लाड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच्यासाठीच काल पोलिस ठाण्यामध्ये कॉट पोहोचला. हा कॉट कशासाठी पोहोचला, याची चौकशी करण्याची मागणी देखील वडेट्टीवार यांनी राज्य सरकारकडे केली. पूर्ण बातमी वाचा…