सोलापूर: धनगर आरक्षणाच्यासाठी दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अंगावर भंडारा उधळल्याचे प्रकरण ताजे असतानाच सोमवारी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दालनात धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी येऊन जोरदार तोडफोड केली आणि घोषणाबाजी केली. यावेळी बिंदू नामावली पूर्ण झाली असून धनगर समाजाचे साडेतीन टक्के आरक्षणानुसार शिक्षक भरती करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले.

धनगर समाजातील शरणू हांडे (रा सोलापूर), सोमलिंगग घोडके (रा अक्कलकोट), धनाजी विष्णू गडदे (मंगळवेढा),अंकुश केरपप्पा गरांडे (मंगळवेढा), हे कार्यकर्ते सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास जिल्हा परिषदेमध्ये अचानक आले. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे या यशवंतराव चव्हाण सभागृहात अधिकाऱ्यांची समन्वय सभा घेत होत्या. अचानक हे कार्यकर्ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात घुसले आणि आतील सर्व खुर्च्याची तोडफोड करण्यास सुरुवात केली. कार्यालयातील खिडक्यांच्या काचा फोडल्या. बाहेरील त्यांच्या बोर्डावर शाई फेकण्यात आली. खुर्च्या फेकून निषेध केला.

पोलिसांना ही माहिती मिळताच तातडीने पोलीस जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सदर बाजार पोलीस ठाण्याकडे रवाना केले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावलीचे काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये शिक्षक भरतीत धनगर समाजाच्या साडेतीन टक्के आरक्षणा नुसारच ही भरती व्हावी अन्यथा धनगर समाज पेटून उठेल, असा इशारा शरणू हांडे यांनी दिला. या घटनेनंतर जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात सुरू असलेली मीटिंग सोडून अधिकारी तातडीने खाली आले. पोलिसांनी लगेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जाऊन सर्व तोडफोडीची पाहणी केली. त्यामुळे बराच वेळ जिल्हा परिषदेमध्ये वातावरण तणावपूर्ण बनले होते.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *