दिव्य मराठी विशेष:विशेष मुले, तस्करीतून सुटका झालेल्या मुली चालवतात कॅफे; 1200 हून जास्त निराधार कुटुंबांना ‘स्पेशल 16’चा मोठा आधार
कोलकाताजवळील डमडममध्ये सुरू झालेला ‘अपॉर्च्युनिटी कॅफे’ इतर कोणत्याही कॅफेपेक्षा निराळा आहे. कारण ते चालवणारे वेगळे आहेत. ते म्हणजे ‘स्पेशल-१६’. ते विशेष यासाठी की या १६ पैकी ९ जण विशेष मुले आहेत. ५ जणांची मानवी तस्करीतून सुटका केली गेली आणि २ सेक्सवर्करची मुले आहेत. विविध पाककृती करण्यापासून ते बिलिंग करण्यापर्यंतची सगळी कामे २२ ते ३३ वयोगटातील ही मुले करतात. त्यांच्या कमाईतूनच १२०० पेक्षा जास्त निराधार मुलांचा उदरनिर्वाह चालतो. रेस्क्यू अँड रिलिफ फाउंडेशनने ३४ लाख रुपये खर्चून हा कॅफे सुरू केला. तो शून्य नफा तत्त्वावर चालवता जातो. संस्थेचे संस्थापक व व्यवसायाने वकील सिद्धांत घोष म्हणाले, भागीदार सुमंत सिंघरॉय यांच्या सहकार्याने २०१३ मध्ये ही संस्था सुरू करण्यात आली. या संस्थेचे पश्चिम बंगालमध्ये ८ चिल्ड्रन होम व कानपूरमध्ये १ आेल्डएज होम आहे. तेथे देशभरातून सुटका केलेली मुले आणली जातात. त्यात काही विशेष मुलेही असतात. वयाच्या १८ व्या वर्षांनंतर मुलांना तसेही होम सोडावे लागते. सामान्य लोकांना काम मिळते. परंतु यांना कोणीही काम देत नाही. अशा व्यक्तींकडून काहीही काम होऊ शकत नाही, असे लोक सांगतात. परंतु आम्ही त्यांच्यात कौशल्य विकास घडवून त्यांना ‘आम्ही सर्व गोष्टी करू शकतो’ इथपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. यंदा जानेवारीत सुरू झालेल्या कॅफेच्या यशानंतर आता दुसरा कॅफे सुरू करण्याचा प्रयत्न करत आहोत. दिल्लीहून दोन बहिणींना तस्करांच्या तावडीतून सुटका करून आणले होते. दोन्ही बहिणी याच कॅफेमध्ये काम करतात. १८ वर्षीय पूजा (नाव बदलले) स्वत:च्या पायावर उभी असल्याने आनंदित आहे. आई-वडिलांना हे पाहून खूप आनंद झाला असता. मला मुलांसाठी काम करायचे आहे, असे ती सांगते. वैशिष्ट्ये .. विशेष मुलांसाठी कॅफेवर अकादमीही चालवली जाते सिद्धांत म्हणाले, कॅफे सुरू होण्यापूर्वी आम्ही त्यांना भोजन तयार करण्यापासून ग्राहकांशी संवाद साधण्यापर्यंतचे सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले. या मुलांना हे जमत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही हा कॅफे सुरू केला. कॅफेवर अकादमी सुरू केली. तेथे मुलांना प्रशिक्षण दिले जाते.