दिव्य मराठी विशेष:हेमा समितीच्या अहवालावर गप्प बसलेले पुरुष मुलांसाठी असुरक्षित वातावरण बनवताहेत; घाण साफ न झाल्यास पुढील पिढी हे सोसेल – रेवती
केरळमध्ये न्या. हेमा समितीचा अहवाल आल्यानंतर मल्याळम चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे. संपूर्ण उद्योगातील लपलेले सत्य समोर आले आहे. हे सत्य समोर आणण्यासाठी अनेक महिलांनी दीर्घ लढा दिला. त्यातील प्रमुख नाव म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री रेवती. २०१७ मध्ये एका अभिनेत्रीच्या लैंगिक छळानंतर, रेवतीने अभिनेत्रींसोबत ‘वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ (डब्ल्यूसीसी) ची स्थापना केली आणि इंडस्ट्रीबद्दल सत्य जाणून घेण्याचे वचन दिले. दैनिक भास्करने त्यांच्याशी केलेल्या चर्चेतील काही मुद्दे…
या लढ्यात अभिनेत्रींना एका मंचावर आणणे किती कठीण होते?
डब्ल्यूसीसीच्या मंचावर अभिनेत्रींना एकत्र आणण्यात कोणतीही अडचण नव्हती. लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या सहकाऱ्याला मदत करण्यासाठी आम्ही एकत्र आलो. कामाची जागा अधिक चांगली आणि सुरक्षित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.
डब्ल्यूसीसीामुळे काही सदस्यांच्या कामावर परिणाम झाला का?
हे खरे आहे. मी मल्याळम सिनेमात जास्त काम करत नाही, पण काही अभिनेत्रींच्या कामावर त्याचा परिणाम नक्कीच झाला आहे. मात्र, त्याचा फायदा म्हणजे आता मुली बोलायला शिकल्या आहेत. डब्ल्यूसीसीच्या ७ वर्षांच्या संघर्षावर काय सांगाल?
डब्ल्यूसीसी अजूनही शिकण्याच्या प्रक्रियेत आहे. विशाखा मार्गदर्शक तत्त्वे व अन्य धोरणे समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे सुधारणा होईल.
या अहवालावर उद्योग क्षेत्र गप्प का?
ते गप्प का आहेत हा प्रश्न त्यांना विचारायला हवा. त्यांची मुलंही या उद्योगात येतील याचा त्यांना विचार नाही. ही घाण आताच साफ केली नाही आणि सुरक्षित वातावरण निर्माण केले नाही तर एके दिवशी त्यांच्या मुलांनाही हे सहन करावे लागेल.
अभिनेत्री का बोलत नाहीत?
भीतीमुळे बोलता येत नाही. अनेकदा आजूबाजूचे लोकच त्यांना गप्प ठेवतात. पुढे काम मिळणार नाही, अशी भीती चित्रपटसृष्टीत आहे. काही प्रकरणांमध्ये स्त्रिया घरातील एकमेव कमावती आहेत या भीतीने बोलू शकत नाहीत. याशिवाय इंडस्ट्रीत प्रत्येक गोष्ट मुद्दा बनत असल्याने कोणीही उघडपणे सत्य बोलत नाही.
अम्मांच्या नियामक मंडळाचा राजीनामा, याकडे तुम्ही कसे पाहता?
मल्याळम चित्रपटसृष्टीतील कलाकारांची संघटना असलेल्या ‘अम्मा’च्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले राजीनामे त्यांची कमजोरी दर्शवतात. त्याला एक आदर्श ठेवण्याची संधी होती, पण त्याने ती गमावली. त्याला सुधारणा राबवायच्या होत्या.
बॉलीवूडमध्ये कास्टिंग काऊच समस्या आहे, तिथे समिती का नको?
कन्नड-तेलुगू इंडस्ट्रीतही त्याची मागणी वाढत आहे. खरं तर आम्ही अशा समस्या सामान्य म्हणून स्वीकारल्या आहेत. पण बदल आवश्यक आहे. बॉलीवूडमध्ये सध्या असलेल्या या समस्या तेव्हाच सुटतील, जेव्हा आपण त्यांना खोलवर समजून घेऊन ठोस पावले उचलू.