: तेलंगणातील हैदराबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रेस्टॉरंटमध्ये बिर्याणीच्या एक्स्ट्रा रायत्यावरुन वाद झाला. ग्राहकानं मागितल्यानं वादाला सुरुवात झाली. रेस्टॉरंटच्या काही कर्मचाऱ्यांनी ग्राहकाला मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे ग्राहकाचा मृत्यू झाला. लियाकत असं मृताचं नाव आहे. तो ३० वर्षांचा होता. लियाकत चंद्रयानगुट्टाचा रहिवासी होता. लियाकत त्याच्या तीन मित्रांसोबत जेवायला पंजागुट्टा एक्स रोडवरील मेरिडियन हॉटेलमध्ये बिर्याणी खायला गेला होता. तिथे त्यांनी अधिक रायता मागितला. त्यावरुन कर्मचाऱ्यांसोबत वाद झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिर्याणी खाताना लियाकत आणि त्याच्या मित्रांनी एक्स्ट्रा रायता मागितला. तेव्हा हॉटेलच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांचं भांडण झालं. लियाकतची एका कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली. प्रकरण मारामारीपर्यंत गेलं.वाद वाढत गेला. दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यांच्यात हाणामारी झाली. घटनेची माहिती पोलीस रेस्टॉरंटला पोहोचले. यानंतर ग्राहक आणि हॉटेल कर्मचाऱ्यांनी एकमेकांविरोधात पंजागुट्टा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. मारहाणीत लियाकतला फारसं लागलं नव्हतं. पण पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याला उलट्या सुरू झाल्या. उलट्या करताना तो पोलीस ठाण्यातच कोसळला.लियाकतला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. लियाकतला रुग्णालयात दाखल करण्यात विलंब झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला. पोलिसांनी लियाकतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालातूनच मृत्यूचं खरं कारण समोर येईल, असं पोलिसांनी सांगितलं. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आलं असून तपास सुरू आहे.