मराठ्यांच्या मतांमुळेच इतके आमदार निवडून आले- जरांगे:नवे सरकार आले की लगेच उपोषणाची तारीख सांगणार
‘आम्ही मराठे या वेळच्या मैदानातच नव्हतो तर आम्ही फेल झालाे असे तुम्ही म्हणताच कसे ? काही बांडगुळं बोलताय, जरांगे फॅक्टर फेल झाला, पण आम्ही मैदानातच नाहीत. नवे सरकारही मराठ्यांच्या ताकदीवर येणार आहे. जेवढे लोक निवडून आलेत त्यांच्या मागे मराठा फॅक्टर आहे. काही जणांना दुसऱ्याचे पाळणे लोटायची सवय आहे,’ अशा शब्दांत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी टीकाकारांना फटकारले. पत्रकार परिषदेत जरांगे म्हणाले, ‘मी सरकारला सांगतो, तुम्ही मराठा आरक्षण तातडीने द्यावे, अन्यथा मराठे पुन्हा छाताडावर बसणार आहेत. आमच्यासोबत बेइमानी करायची नाही. सरकार स्थापन झाले की लगेच उपोषणाची तारीख ठरवून जाहीर करणार आहोत. आम्ही आमच्या लेकरांपासून दूर जाऊ शकत नाहीत. कोणाचेही सरकार येऊ द्या. त्यांचे सरकार आले आहे त्याबद्दल त्यांना शुभेच्छा. मोठ्या मनाने त्यांचे अभिनंदनसुद्धा केले पाहिजे आणि ते संस्कार मराठ्यांवर आहेत, पण मराठा आरक्षणात खोडा घालायचा नाही, नाही तर मराठे तुम्हाला ताळ्यावर आणल्याशिवाय राहणार नाहीत.’ जरांगे फॅक्टर कळायला तुमची हयात जाईल ‘कोण निवडून आला काय आणि कोण पडला काय याचं आम्हाला काही सोयरसुतक नाही. एखाद्या आमदाराने म्हणावे की तो मराठ्यांच्या जिवावर निवडून आला नाही. जरांगे फॅक्टर आणि मराठा फॅक्टर कळायला तुमची हयात जाईल तरी तुम्हाला कळणार नाही. तुम्ही मराठ्यांच्या नादी कशाला लागता, असा सवालही मनोज जरांगे यांनी उपस्थित केला.