शेळीपालन हा व्यवसाय देखील शेतीला जोडधंदा म्हणून केला जातो. शेळीपालन या व्यवसायामध्ये आपल्याला जास्त खर्चाची गरज नसते. या व्यवसायाची सुरुवात आपण एका शेळी पासून सुद्धा करू शकतो. या व्यवसायाचा फायदा हा आपल्याला दोन कामासाठी होतो तो म्हणजेच दुधासाठी आणि मासांसाठी होतो. हे लक्षात घेऊन लोहा तालुक्यातील कलंबर खुर्द येथील रहिवासी रामकिशन घोरबांड यांनी शेळी पालनाचा व्यवसाय सुरू केला.
कंधार तालुक्यातील शिवाजी माध्यमिक विद्यालयात घोरबांड हे ज्युनिअर प्राध्यापक पदी कार्यरत आहे. कलंबर गावात त्यांना पाच एकर शेती आहे. शेती व्यवसायासोबत जोड व्यवसाय करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर त्यांनी बंदिस्त शेळीपालनाची माहिती घेतली. यूट्यूब वर शेळीपालना बाबत माहिती मिळवली तसेच मित्रांचे मार्गदर्शन देखील घेतले.
२०१९ मध्ये त्यांनी साडेतीन लाख रुपये खर्च करून पंजाब राज्यातून अफ्रिकन प्रजातीच्या १५ शेळ्या आणि एक बोकड खरेदी केले. शेतात शेड देखील उभारले. राधाई गोट फार्म सुरु केला. छोट्याश्या या व्यवसायातून त्यांनी उभारी घेतली आणि आज घडीला त्यांच्याकडे अफ्रिकन बोअर प्रजातीच्या ६० शेळ्या आहेत. शेळी विक्रीतून त्यांना वर्षाकाठी चार लाखांपर्यंत उत्पन्न मिळालं असून असंच उत्पन्न पुढील तीन वर्ष सुरु राहणार आहे. नांदेड जिल्ह्यात आफ्रिकन बोअर शेळी पाळनाचा हा व्यवसाय पहिलाच असल्याचं सांगितलं जात आहे.
निसर्गाच्या अवकृपेने अथवा इतर कोणत्याही कारणाने कोरडवाहू अथवा सिंचनाचे अंतर्गत असणाऱ्या शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाची हमी नसल्यामुळे, शेतकऱ्यांना पर्यायी उत्पन्नाचे साधन म्हणून, शेतीपूरक व्यवसाय करणे आवश्यक आहेत. या अशा व्यवसायांद्वारे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधरविण्यास मदत होते असे प्रा. रामकिशन घोरबांड सांगतात.