खाद्यतेल, कांदा, गव्हाचे विक्रमी उत्पादन… तरीही दरवाढीचे चटके:खिशावर परिणाम; खाद्यतेलाच्या दरात तेजी
देशात विक्रमी उत्पादन होऊनही सोयाबीन तेल, कांदा, पीठ यासारख्या जीवनावश्यक खाद्यपदार्थांच्या किमती कमी होण्याऐवजी वाढत आहेत. सोयाबीन तेल अवघ्या १३ दिवसांत ३०% महागले. अवघ्या चार महिन्यांत कांद्याचे भाव अडीचपट (२०-२५ ते ६० रुपयांपर्यंत) वाढले. गेल्या सहा महिन्यांत पीठ ७ रुपयांवर महागले. या वेळी देशात १.२७ कोटी टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज असताना ही स्थिती आहे. गेल्या वर्षी ते केवळ १.२५ कोटी टन होते. तसेच रब्बीत १.९१ कोटी टन कांद्याचे उत्पादन झाले. हे मागील रब्बी हंगामाच्या तुलनेत २७% अधिक आहे. त्याच वेळी २३-२४ च्या हंगामात ११.२९२ कोटी टन गव्हाचे विक्रमी उत्पादन झाले. इतके उत्पादन पूर्वी कधीच नव्हते. २०२२-२३ मध्ये ते ११.०५ कोटी टन होते. यात सुमारे ३% वाढ झाली. विक्रमी उत्पादन होऊनही महागाई वाढण्यामागे मोठे कारण म्हणजे सरकारी निर्णय. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मे महिन्यात कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली होती. यानंतर कांद्याचे भाव वाढू लागले. या वेळी सोयाबीनचे पीक चांगले आले. बाजारात शेतमालाला भाव मिळत नव्हता. शेतकरी आंदोलन करू लागले. ही नाराजी दूर करण्यासाठी सरकारने सोयाबीनच्या आधारभूत किमतीत वाढ करून खरेदी सुरू केली. खाद्यतेलावरील आयातशुल्क २२% वाढवले. परिणामी, दर वाढले. दोन वर्षांपासून रिकामे भांडार भरण्यासाठी सरकारने आधारभूत किमतीवर गव्हाची मोठी खरेदी केली. खुल्या बाजारात गव्हाची उपलब्धता कमी झाल्यावर नफेखोरांनी भाव वाढवले. सोयाबीनचे भाव क्विंटलमागे ८९२ रुपयांनी वाढवले होते सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे (सोपा) कार्यकारी संचालक डी.एन. पाठक म्हणाले, सोयाबीन तेलात सुमारे ४०% विदेशी पाम तेल मिसळले जाते. सोयाबीन उत्पादनात आघाडीवर असलेल्या मध्य प्रदेश-महाराष्ट्रात शेतकऱ्यांना ४००० रुपये क्विंटलपेक्षा कमी भाव मिळत होता. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने ४,८९२ रुपये क्विंटल दराने खरेदी जाहीर केली. त्याच वेळी, विदेशी पाम तेलावरील आयात शुल्क १३.७५% वरून ३५.७५% पर्यंत वाढवल्याने किंमत वाढली. नाशिक जिल्हा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष निवृत्ती निहारकर म्हणाले, रब्बीत १.९१ कोटी टन कांदा उत्पादन झाले. हे मागील वेळेपेक्षा २७% अधिक आहे. या हंगामातील उत्पादन २ कोटी टन राहिले तरी हंगामातील एकूण उत्पादन विक्रमी ३५ दशलक्ष टन होईल. कांदा निर्यातीस परवानगीनंतर आशियातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ लासलगावमध्ये ७ ते ८ रु. भाव वाढले. पण, इतर भागात गेल्या वर्षीच्या तुलनेत किमती दुप्पट (सुमारे ६० रुपये) झाल्या आहेत. खिशावर परिणाम; खाद्यतेलाच्या दरात तेजी खाद्यतेल : सरकारने १४ सप्टेंबरला खाद्य तेलावरील आयात शुल्क वाढवले. १३ दिवसांत (२७ सप्टेंबर) किंमत १०० रुपयांवरून १३० झाली.
कांदा: सरकारने ५ मे रोजी निर्यातीला मान्यता दिली. त्या वेळी कांद्याचा भाव २०-२५ रुपये किलो होता. सप्टेंबरमध्ये भाव ६० रु. किलाेवर गेले.
पीठ: परदेशातील ऑर्डर पूर्ण पूर्ततेसाठी गिरण्यांनी किमती वाढवल्या. यामुळे सहा महिन्यांत किंमत २८ रुपयांवरून ३५ रुपये किलो झाली. तज्ज्ञ : आयात शुल्क वाढवा, पिकांना रास्त भाव द्या
शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य भाव मिळाला तरच उत्पादन वाढेल. आयात पिकांवर आयात शुल्क वाढवून सुरुवात करा. देशातील तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी पिवळ्या क्रांतीची सुरुवातही कृषी उत्पादनांवर भारी आयात शुल्काने झाली. कांद्याला रास्त भाव मिळावा यासाठी निर्यात शुल्क हटवणे आवश्यक होते. – देवेंद्र शर्मा, कृषितज्ज्ञ मैदा ३६ रु. किलो आहे. गतवर्षीपेक्षा ४ रु. जास्त. सरकारकडे कमी शिल्लक साठा असल्याने खुल्या बाजारात विक्रीला विलंब होतोय. अर्थात, उत्पादन जास्त आहे, परंतु युक्रेन-रशिया युद्धानंतर प्रचंड निर्यातीनंतर सरकारी साठा जवळजवळ संपला होता. अशा स्थितीत अधिक खरेदी झाली. त्यामुळे मिल्सना गहू मिळत नाही. – प्रमोद जैन, अध्यक्ष, ऑल इंडिया मिलर्स असो.