एकाच फोटोमध्ये विविध घोटाळ्यांतील रथी महारथी:यांना सरकारमध्ये घेऊन भाजप भ्रष्टाचार संपवणार, अंजली दमानियांचा महायुतीवर निशाणा

एकाच फोटोमध्ये विविध घोटाळ्यांतील रथी महारथी:यांना सरकारमध्ये घेऊन भाजप भ्रष्टाचार संपवणार, अंजली दमानियांचा महायुतीवर निशाणा

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक ट्विट करत महायुती सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अंजली दमानिया यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये महाराष्ट्रातल्या विविध घोटाळ्यांविरुद्ध, विरोधी पक्ष नेते म्हणून आवाज उठवणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर कोण रथी महारथी आहेत बघूया, असे म्हणत त्यांनी टीका केली आहे. अंजली दमानिया यांनी पोस्ट केलेल्या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार नारायण राणे, आमदार छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, अशोक चव्हाण तसेच सुनील तटकरे दिसत आहेत. यात अंजली दमानिया यांनी प्रत्येकाच्या नावासमोर घोटाळ्याचे नाव नमूद केले आहे. काय म्हणाल्या अंजली दमानिया? या फोटो मधे महाराष्ट्रातल्या विविध घोटाळ्यांविरुद्ध, विरोधी पक्ष नेते म्हणून आवाज उठवणाऱ्या देवेंद्र फडणवीसांबरोबर कोण रथी महारथी आहेत ते पाहुया..
1) सिंचन घोटाळा फेम अजित पवार व सुनील तटकरे
2) आदर्श घोटाळा फेम अशोक चव्हाण व नारायण राणे
3) महाराष्ट्र सदन घोटाळा फेम छगन भुजबळ
4) एविएशन घोटाळा फेम प्रफुल्ल पटेल
ह्या सगळ्यांना सरकारमध्ये घेऊन भाजप खरोखर भ्रष्टाचार संपवणार ह्यात काहीच शंका नाही., अशी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा विरोधी पक्ष नेते होते तेव्हा त्यांनी या सगळ्यांच्या विरोधात आवाज उठवला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते. अंजली दमानिया यांनी यापूर्वी देखील सिंचन घोटाळ्यावरून अजित पवार तसेच सुनील तटकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. सिंचन घोटाळा 1999 ते 2009 या काळात बंधारे आणि सिंचन प्रकल्पांच्या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचा आरोप झाला. सिंचनावर 70,000 कोटी रुपये खर्च झाले, पण सिंचन क्षेत्रात केवळ 0.1 टक्क्यांची सुधारणा झाली असे निरीक्षण सरकारच्याच इकोनॉमिक सर्व्हे मध्ये होते. या काळात अजित पवार हे जलसंपदा मंत्री होते. आदर्श सोसायटी घोटाळा अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श सोसायटी घोटाळ्याचे आरोप करण्यात आले होते. अशोक चव्हाण यांच्यासह 13 जणांवर आरोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले होते. आदर्श सोसायटीला अतिरिक्त एफएसआय मंजूर करण्याच्या बदल्यात सासू आणि मेव्हण्याला या इमारतीत फ्लॅट मिळवून दिल्याचा आरोप चव्हाण यांच्यावर ठेवण्यात आला होता. महाराष्ट्र सदन घोटाळा 2005 मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. छगन भुजबळ यांनी आपल्या कुटूंबाला वेगवेगळ्या कंत्रांटांच्या माध्यमातून आर्थिक फायदे करुन दिल्याचा आरोप केला गेला. छगन भुजबळ यांच्या कुटूंबाला आणि त्यांच्या मालकीच्या कंपन्यांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लाच मिळाल्याचा आरोप भुजबळ यांच्यावर झाला होता. 11 जून 2015 साली भुजबळ यांच्याविरोधत काळा पैसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमपीएल) त्यांच्यावर 2 गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळ, पंकज भुजबळ, तन्वीर शेख, इम्रान शेख यांच्यासहीत एकूण 52 जणांच्या नावाचाही समावेश होता. एविएशन घोटाळा 2008-09 दरम्यान काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या काळात झालेल्या आर्थिक अडचणीत सापडलेल्या एअर इंडियाशी संबंधित कथित विमान वाहतूक घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने 2019 साली समन्स बजावले होते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment