एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ:तिसऱ्या वेळी माफी नाही तर मंत्रिपद बदलू, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचा मंत्र्यांना इशारा

एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ:तिसऱ्या वेळी माफी नाही तर मंत्रिपद बदलू, राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांचा मंत्र्यांना इशारा

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर तयारी सुरू झाली आहे. तसेच पक्षांच्या बैठकी देखील पार पाडल्या जात आहेत. अशातच राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाची बैठक पार पडली आहे. यावेळी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या मंत्र्यांना एकदा दोनदा चूक झाली तर समजून घेऊ, मात्र तिसऱ्या वेळी माफी नाही तर मंत्रिपद बदलू, असा थेट दमच अजित पवारांनी भरला आहे. मंगळवारी पार पडलेल्या या बैठकीत अजित पवारांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना देखील झापल्याचे समजते. सातत्याने माध्यमांमध्ये पक्षाला अडचणीत टाकणारी वक्तव्ये करणे, जनता दरबारला हजर न राहणे, यावरून अजित पवारांनी माणिकराव कोकाटे यांना झापले असल्याची माहिती समोर आली आहे. माणिकराव कोकाटे हे या बैठकीला अर्धा तास उशिरा आले होते, यामुळे देखील अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे पदाधिकारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत. वक्फ सुधारणा विधेयकातील काही मुद्यांबाबत ही भेट होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अमित शहा यांनी सभागृहात जे आश्वासन दिले आहे ते कागदावर असावे, अशी मागणी या भेटीत हे शिष्टमंडळ करणार असल्याचे समजते. वक्फ बोर्डावर गैर मुस्लिम सदस्य नको, अनेक वर्षांपासून वक्फ बोर्डकडे जी जमीन आहे, त्याचे मूळ मालक कोण याचा शोध घेण्याबाबत जो मुद्दा मांडला आहे, त्याचा विचार करावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. विधेयकामध्ये 40 पैकी 14 विषय बाजूला करण्यात आले आहेत, त्याबाबत देखील कागदोपत्री स्पष्टता आणावी अशी विनंती केली जाणार आहे. पक्षाकडून माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावर सदर भेटीसाठीचे निवेदन करण्याची जबाबदारी देण्यात आल्याचे समजते.

  

Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Post comment