घटनेचे गांभीर्य ओळखून सांगली शहर, गुन्हे प्रकटीकरण शाखा आणि आष्टा पोलिसांनी संबंधित आरोपीचा शोध सुरू केला आहे. सदाशिव अशोक सनदे (वय २५ रा. मिसळवाडी, आष्टा) असे पलायन केलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर कारागृहाच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, पलायन केलेला आरोपी सदाशिव सनदे याच्या विरोधात आष्टा पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात त्याला पोलिसांनी अटक केली होती. सध्या सनदे हा जिल्हा कारागृहात न्यायालयीन कोठडी मध्ये आहे. आज दुपारच्या सुमारास कारागृहातील स्वयंपाक खोलीमध्ये तो गेला होता. या ठिकाणी कोणताही सुरक्षा रक्षक नसल्याचे पाहून त्याने भिंतीवरून उडी मारून पटवर्धन हायस्कूल जवळून पलायन केले.
काही वेळातच कारागृह प्रशासनाच्या निदर्शनास सदरची बाब येतात खळबळ उडाली. यानंतर कारागृह प्रशासनाने संबंधित आरोपीचा शोध घेतला असता तो कोठेही मिळून आला नाही. कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने सांगली शहर पोलिसांशी संपर्क साधला व सर्व माहिती दिली. यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सांगली शहर पोलीस तसेच आष्टा पोलिसांनी पलायन केलेल्या सदाशिव सनदे याचा शोध सुरू केला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी जिल्हा कारागृहामध्येच गांजा, मोबाईल आणि दारू सापडले होते. आता यानंतर या ठिकाणी असणाऱ्या आरोपीनेच पलायन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी कारागृह प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Read Latest Maharashtra News And Marathi News