फडणवीस महोदय, सोडणे वगैरे नंतर, अगोदर आरोपी धरा तर!:कृष्णा आंधळे अद्यापही फरार; अंबादास दानवे यांचा निशाणा
बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. अगोदर त्याला धरा आणि त्यानंतर कोणालाही सोडणार नाही, अशी भाषा करा, अशी शब्दात विरोधी पक्ष नेता अंबदास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक आरोपी अद्यापही फरार आहे. केवळ 23 वर्षीय कृष्ण आंधळे हा पोलिसांच्या हातावर तुरी देत असल्याची अशी टीका देखील दानवे यांनी केली आहे. या संदर्भात अंबादास दानवे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. यातील एका पोस्टमध्ये सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवर तर दुसऱ्या पोस्टमध्ये परभणी येथील सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी टीका केली आहे. अंबादास दानवे यांनी केलेली टीका देखील पहा… या संदर्भात अंबादास दानवे यांनी म्हटले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला महिना उलटला तरी केवळ २३ वर्षे वयाचा एक पोऱ्या, कृष्णा आंधळे हा सहावा आरोपी पोलिसांच्या हाती तुरी देतोय. दुसरीकडे जनभावनेचा आदर म्हणून सरकार धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला तयार नाही. किती हा निगरगट्टपणा. ‘निगरगट्ट’ शब्द पण लाजवला यांनी आता तर! सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात आम्ही कोणाला सोडणार नाही.. महोदय, सोडणे वगैरे नंतर, अगोदर आरोपी धरा तर! अशा शब्दात दानवे यांनी टीका केली आहे. गृहखात्याच्या हेतूबद्दल इतर बोलायला जागा – दानवे
मस्साजोग प्रमाणे परभणीतील सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या तपासावरही दानवे यांनी टीका केली. या संदर्भात केलेल्या पोस्टमध्ये दानवे यांनी म्हटले की, ‘परभणीत काल सूर्यवंशी कुटुंबासाठी देऊ केलेली सरकारी मदत या परिवाराने नम्रपणे नाकारली. ते न्याय मागत आहेत, न्याय,मदत नव्हे. सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूला कारणीभूत असलेले पोलिस अजून खुले फिरत आहेत, त्यांच्यावर साधा एफआयआर अजून नोंदवलेला नाही अशी भावना सूर्यवंशी परिवाराने मांडली. गृहखात्याच्या हेतूबद्दल इतर बोलायला नक्की जागा आहे. देवेंद्र फडणवीस गृहमंत्री कायम ही ना ती म्हण बोलत असतात. एक म्हण आज मलाही त्यांना सांगायची आहे. ‘Justice delayed is justice denied’. असेही दानवे यांनी म्हटले आहे.