भोपाळ: मध्य प्रदेशच्या छिंदवाड्यात एका मुलानं जिवंत असलेल्या वडील आणि भावाचा मृत्यू झाल्याचं घोषित करत मुंडन केलं. शोक संदेश छापून गावात आणि नातेवाईकांमध्ये वाटली. हा धक्कादायक प्रकार वडिलांच्या लक्षात येताच त्यांनी माहुलझिर पोलीस ठाणं गाठलं आणि तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्याची रवानगी कोठडीत केली.घटना माहुलझिर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या जमुनिया गावात घडली आहे. जमुनिया गावात राहणाऱ्या गयाप्रसाद पटेल यांना दोन मुलं आहेत. धाकटा असलेल्या विमलनं वडील आणि भावाचा मृत्यू झाल्याचं सांगत स्वत:चं मुंडन करुन घेतलं. ‘गयाप्रसाद यांनी पोलीस ठाण्यात येऊन त्यांचा मुलगा विमल पटेल विरोधात तक्रार नोंदवली. विमलनं आपली मोटारसायकल न विचारता घेऊन गेल्याचं त्यांनी तक्रारीत नमूद केलं आहे’, अशी माहिती माहुलझिर पोलीस ठाण्याचे प्रभारी तरुण मरकाम यांनी दिली.
विमलनं आधी जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर स्वत:चं मुंडन करुन घेत वडील आणि भाऊ गेल्याचा शोक संदेश छापून गावात, नातेवाईकांमध्ये वाटल्या, अशी माहिती गयाप्रसाद यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या ताब्यात असलेली मोटार सायकल जप्त केली. त्यानं छापलेले शोक संदेश आणि त्याचा मोबाईलदेखील पोलिसांनी हस्तगत केला.

आरोपी मुलाची पार्श्वभूमी गुन्हेगारीची असल्याचं पोलीस ठाण्याच्या प्रभारींनी सांगितलं. ‘विमलनं याआधीही त्याच्या वडिलांना त्रास दिला आहे. त्यांना मारहाण करुन घराबाहेर काढलं आहे. त्यांची शेतीवाडी, घर आणि ट्रॅक्टरवर कब्जा केला आहे. महिलेची छेड काढल्याचा गुन्हा त्याच्याविरोधात दाखल केला आहे. मारहाण केल्याची नोंददेखील त्याच्याविरोधात नोंद आहे,’ असं पोलीस अधिकारी तरुण मरकाम यांनी सांगितलं. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.