मुदत ठेवीत गुंतवणूक
जेव्हा तुम्ही मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करता तेव्हा तुमची गुंतवणूक एका विशिष्ट कालावधीसाठी लॉक (अडकली) केली जाते. त्यामुळे मुदत ठेवीत गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही कालावधी आणि परताव्याची विचारपूर्वक निवड करावी कारण तुमचे पैसे या कालावधीसाठी अडकतात, जे मुदत पूर्तीनंतर व्याज परताव्यासह मिळतात. परंतु आणीबाणीच्या परिस्थितीत तुम्ही FD मॅच्युरिटीपूर्वीच मोडू शकता.
मुदत पूर्वी फिक्स्ड डिपॉझिट मोडण्याचे नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) २६ ऑक्टोबर रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार नॉन-कॉलेबल एफडी ऑफर करण्यासाठी किमान रक्कम १५ लाख रुपयांवरून एक कोटी रुपये केली जाऊ शकते आणि त्यापेक्षा कमी रकमेच्या ग्राहकांकडून स्वीकारल्या जाणार्या सर्व देशांतर्गत मुदत ठेवींमध्ये मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा असेल.
यापूर्वी बँका १५ लाख रुपयांपर्यंतच्या एफडीवर मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देत होत्या, तर आता केंद्रीय बँकेने ही रक्कम तत्काळ प्रभावाने एक कोटी रुपयांपर्यंत वाढवली आहे. म्हणजे आता पैशांची गरज भासल्यास मुदत पूर्तीपूर्वी एफडी मोडू शकता येईल आणि गुंतवणूकदार ठेवी काढू शकतील.
मुदतीपूर्वी FD मोडल्यास दंड किती?
FD मधून मुदतपूर्व पैसे काढण्यासाठी बँका दंड आकारतात. वेगवेगळ्या बँकांमध्ये दंडाची रक्कम वेगवेगळी आहेत जी फक्त तुमच्या व्याजातून वजा केली जाते. काही प्रकरणांमध्ये मुदतीपूर्वी एफडी मोडल्यास १% पर्यंत दंड भरावा लागू शकतो. बँका तुमच्याकडून सामान्यतः व्याजदराच्या ०.५% ते १% पर्यंत दंड आकारते. म्हणजे तुमच्या व्याजाच्या पैशातून दंड कापला जातो.
SBI किती शुल्क आकारते?
एसबीआयच्या नियमांनुसार जर तुमची एफडी मुदत पूर्तीपूर्वी मोडली, तर तुमचे व्याज १% पर्यंत कमी केले जाईल. याशिवाय त्यावर मिळणाऱ्या व्याजावर दंडही वसूल केला जातो. जर तुम्ही पाच लाख रुपयांपर्यंतची एफडी मुदतपूर्तीपूर्वी मोडली तर तुम्हाला ०.५०% दंड भरावा लागेल. तसेच पाच लाखांपेक्षा जास्त आणि एक कोटी रुपयांपेक्षा कमीची एफडी मुदतपूर्व मोडल्यास १% दंड भरावा लागेल.