मुंबई: लोकप्रिय टीव्ही स्टार शहीर शेखची पत्नी रुचिका कपूर आणि त्यांची १६ महिन्यांची मुलगी एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावल्याची घटना घडली आहे. रुचिका राहत असलेल्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली होती. ती तिच्या मुलीसोबत आई-वडिलांच्या घरी राहते. त्याच इमारतीला आग लागलेली. रुचिका, तिची १६ महिन्यांची मुलगी आणि यांच्यासह रुचिकाचे वडील या आगीत अडकले होते. रुचिकाचे वडील व्हीलचेअरवर असल्याने ते त्यांनाही काही करता येत नव्हते, परिणामी हे तिघेही इमारतीत अडकले होते. तेव्हा अभिनेता शहीर शेख त्यांच्या मदतीला धावून गेला.

रुचिकाने अशा कठीण परिस्थितीत घाबरुन न जाता हिंमतीने काम केलं आणि तिने शांतपणे शहीरला कॉल केला. तिने शहीरला माहिती दिली की इमारतीला आग लागली आहे. रुचिकाने घडला प्रकार इन्स्टाग्रामवर शेअर केला असून तिने अशी माहिती दिली की वडील व्हिलचेअरवर असल्याने तिला मुलगी अनायासह १५ फ्लोअर खाली उतरणं एकटीला शक्य नव्हतं. ही घटना २५ जानेवारी रोजी रात्री घडली.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये रुचिकाने लिहिलं की, ‘रात्री १.३० वाजता आम्हाला कॉल आला की आमच्या इमारतीमध्ये आग लागली आहे. जेव्हा आम्ही मुख्य दरवाजा उघडला तेव्हा मोठ्या प्रमाणात काळा धूर येत होता. आम्हाला बाहेर पडणं कठीण झालेलं. आम्हाला कळून चुकलं की तिथेच थांबावं लागेल, पण हे माहीत नव्हतं की किती वेळ वाट पाहावी लागेल. मी पॅनिक न होता काय घडलं आहे हे सांगण्यासाठी शहीरला फोन केला, मला त्याला घाबरवायचे नव्हते.’

रुचिकाने पुढे लिहिलं की, ‘माझे वडील व्हिलचेअरवर आहेत आणि माझं बाळ अवघ्या १६ महिन्यांचं. मला समजलं की तिथून बाहेर पडणं कठीण होतं, जरी लोक ओरडत होते की बाहेर पडण्यासाठी घाई करा म्हणून. १५ माळे उतरणं कठीण होतं. आम्ही धूर आतमध्ये येऊ नये याकरता ओला टॉवेल दरवाज्याखाली लावला होता, पण धूर वेगाने आत शिरत होता.’

तिने अशी माहिती दिली की फायर फायटर्सकडून त्यांना मदत केली जात होती. शहीर आणि इतर काही जणं इमारतीतील गाड्या हटवण्याचे काम करत होते, जेणेकरून अग्निशामक दलाच्या गाड्यांना जागा होईल. रुचिकाने पुढे म्हटले की, ‘मला माझ्या शेजाऱ्यांनी फोन करून सांगितले की शहीर फायर एस्टिंगव्युशर घेऊन धावत पुढे गेलेला आणि त्याने अग्निशमन दल येण्यापूर्वी आग विझवण्याचा प्रयत्न केला.’


रुचिकाने पुढे सांगितले की, ‘त्यानंतर अग्निशमन यंत्रणा आली. शेवटी ३.३० वाजता शहीर, माझा दीर आणि ४ फायर फायटर आमच्यापर्यंत पोहोचले. अशी परिस्थिती कदाचित पहिल्यांदाच आली होती. आधी आम्ही आई आणि मुलगी अनायाला बाहेर काढले. त्यानंतर शहीर आणि दीराने माझ्या वडिलांना व्हिलचेअरवरुन उचलून घेत १५व्या मजल्यावरुन खाली नेले. तोपर्यंत पहाटेचे ५ वाजले होते. ज्यांनी आम्हाला वाचवले त्या सर्व अग्निशमन दलाची मी आभारी आहे. मला याचा आनंद आहे की, अनाया आणि मी हा वीकेंड आमच्या पालकांसोबत घालवण्याचा निर्णय घेतला होता. कारण हा विचार करूनही भीती वाटते की आम्ही नसतो तर काय झालं असतं. शहीरने आमच्यासाठी जे केले ते एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे होते’.

शहीरने मानले फायर फायटर्सचे आभार

शहीर शेखनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत अग्नीशमन दलाचे आभार मानले आहेत. त्याने लांबलचक पोस्ट शेअर करत आगीपासून इमारतीतील लोकांना वाचवणाऱ्या फायर फायटर्सचा फोटोही शेअर केलाय.


कंगना रणौत, सोनम कपूर, आयुष्मान खुरानाने केली विचारपूस

दरम्यान रुचिकाने शेअर केलेला घडला प्रकार नक्कीच धक्कादायक होता. तिने शेअर केलेल्या पोस्टवर बॉलिवूड तसंच टेलिव्हिजन विश्वातील दिग्गजांनी कमेंट करत शहीर आणि रुचिकाची विचारपूस केली आहे. कंगना रणौत, सोनम कपूर, आयुष्मान खुराना, अनिता हसनंदानी, अर्जुन बिजलानी, क्रिस्टल डिसुझा, हुमा कुरेशी या कलाकारांनी रुचिकाच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. ही घटना अत्यंत भीतीदायक असल्याचे म्हणत त्यांनी रुचिकाला धीर देण्याचा प्रयत्न केला.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *