वॉशिंग्टन: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका घरमालकावर एकाच कुटुंबातील ८ जणांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भाड्यानं राहणाऱ्या कुटुंबानं घरभाडं थकवलं होतं. त्यामुळे भाडेकरु आणि मालकामध्ये वाद सुरू होता. याच वादातून मालकानं भाडेकरु राहत असलेली संपूर्ण इमारत पेटवली.इमारतीला आग लावून कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी ६६ वर्षीय रफिकुल इस्लामला अटक केली आहे. भाड्यानं राहणाऱ्या कुटुंबात सहा लहान मुलं होती. या कुटुंबानं बऱ्याच महिन्यांपासूनच भाडं थकवलं होतं. ते घरदेखील रिकानं करत नव्हते. त्यामुळे मालक आणि भाडेकरु यांच्यात वाद सुरू होता.न्यूयॉर्क शहर अग्निशमन दलानं फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबद्दलची माहिती दिली. अग्निशमन दलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, रफिकुल इस्लामच्या मालकीच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर एक कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांनी भाडं देणं बंद केलं. ते घर रिकामीदेखील करत नव्हते. त्यामुळे संतापलेल्या रफिकुलनं इमारतीच्या जिन्याला आग लावली. त्यावेळी घरात आठ जण होते. त्यात सहा मुलांचा समावेश होता.दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबानं भाडं न दिल्यास घराचा गॅस आणि वीज पुरवठा खंडित करुन घर पेटवून देण्याची धमकी इस्लामनं दिली होती असा दावा पीडित कुटुंबानं केला आहे. पोलिसांनी जवळपास चार आठवडे घटनेचा तपास केला. त्यात त्यांना एका सीसीटीव्हीत इस्लाम मास्क आणि हुडी घालून प्रवेश करताना दिसला. चेहरा दिसू नये यासाठी त्यानं मुखवटादेखील लावला होता.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *