दोहा : अखेरच्या क्षणाला रूझबेह चेश्मी (९०+८ मि.) आणि रामिन रेझाइआन (९०+११ मि.) यांनी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर इराणने शुक्रवारी फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये वेल्सला २-० असे पराभूत केले. यासह ६४ वर्षांनंतर वर्ल्ड कपमध्ये खेळत असलेला वेल्स संघ साखळीतच गारद होण्याच्या मार्गावर आहे.

जागतिक क्रमवारीत इराण विसाव्या, तर वेल्स १९व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी, हे संघ १९७८मध्ये आमनेसामने आले होते. त्यात वेल्सने विजय मिळवला होता. यंदा वर्ल्ड कपमधील सलामीच्या सामन्यात इंग्लंडकडून इराणला २-६ अशी हार पत्करावी लागली होती, तर दुसरीकडे वेल्स आणि अमेरिका यांच्यातील सलामीची लढत १-१ अशी बरोबरीत सुटली होती. वेल्सकडून बाराव्याच मिनिटाला कॉनर रॉबर्ट्सच्या सुरेख पासवर मूरने गोल नोंदवण्याचा जबरदस्त प्रयत्न केला होता. मात्र, तितक्याच चपळतेने इराणचा गोलरक्षक हुसेनीने हा प्रयत्न हाणून पाडला. त्यानंतर, सोळाव्या मिनिटाला अली घोलीझादेहने गोल नोंदवला होता. त्या वेळी इराणच्या चाहत्यांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मात्र, हा आनंद क्षणभराचा ठरला. ‘ऑफसाइड’मुळे हा गोल नाकारण्यात आला. त्यानंतर दोन्ही संघांनी प्रयत्न केले. मात्र, मध्यंतरापर्यंत गोलशून्य बरोबरी कायम होती.

उत्तरार्धात इराणने जोरदार सुरुवात केली. ५१व्या मिनिटाला सरदार अझमोनने जबरदस्त प्रयत्न केला होता. मात्र, चेंडू गोलपोस्टच्या बारला लागून परतला. पुढच्याच मिनिटाला घोलीझादेहनेही मारलेला चेंडूही गोलपोस्टच्या बारला लागून परतला. त्या वेळी सरदारने पुन्हा एकदा प्रयत्न केला होता. मात्र, तो गोलरक्षकाला चकवू शकला नाही. त्यानंतरही इराणच्या खेळाडूंनी सुरेख चाली रचल्या. ८५व्या मिनिटाला मेहदी तारेमी वेल्सच्या गोलपोस्टच्या दिशेने कूच करीत होता, त्या वेळी वेल्सचा गोलरक्षक वेन हेनसीने तारेमीला चुकीच्या पद्धतीने रोखले. त्यानंतर रेफ्रींनी ‘रिव्ह्यू’ पाहून हेनसीला रेड कार्ड दिले. ही लढत बरोबरीत सुटणार असे वाटत होते. मात्र, भरपाई वेळेत वेल्सच्या जो अॅलनकडून चूक झाली. त्याने परतवलेला चेंडू चेश्मीकडे गेला आणि या संधीचे चेश्मीने सोने केले. त्याने गोल नोंदवून इराणचे खाते उघडले. त्यापाठोपाठ, रामिन रेझाइआनने आणखी एक गोल नोंदवून इराणच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *