पाच लाख बालकांना देणार जंतनाशक गोळी:जंतनाशक दिन बुधवारी; 1 ते 19 वयोगटातील मुलांसाठी राबवणार माेहीम
जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत बुधवार, ४ डिसेंबरला राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त मोहीम राबवण्यात येणार आहे. या दिवशी जिल्ह्यातील १ ते १९ वर्ष वयोगटातील ५ लाख १९ हजार २३९ मुलांना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिन ४ डिसेंबर आणि मॉप अप दिन १० डिसेंबर रोजी राबवण्यात येणार आहे. यात १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व मुला-मुलीना जंतनाशक गोळी देऊन त्यांचे आरोग्य चांगले ठेवणे, पोषण स्थिती, शिक्षण व जीवनाचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश असोले आणि अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण पारिसे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रीय जंतनाशक दिन राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना अर्धा गोळीची मात्रा पावडर करून दिली जाणार आहे. तसेच २ ते १९ वर्षे वयोगटातील सर्वांना एक गोळी चावून खावी लागणार आहे. ही मोहीम सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, अंगणवाडी, शाळाबाह्य मुलांमध्ये राबवण्यात येणार आहे. या गोळीमुळे रक्तक्षय, अॅनिमिया कमी होतो. परिणामी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती नियमित होते. बालक क्रियाशील बनते. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शारीरिक व बौद्धीक वाढ सुधारते. आरोग्य चांगले राहते. अल्बेंडेझोलच्या एका डोसमुळे जंताचा नाश होतो. या गोळीचा दुष्परिणाम नाही. ही गोळी प्रत्यक्ष खाऊ घालायची आहे. ती घरी घेऊन जाता येणार नाही. शाळाबाह्य मुलांना आशा स्वयंसेविकेमार्फत गोळीचे वाटप करण्यात येणार आहे. पालक, शिक्षक, संस्थांनी मोहीम यशस्वी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केले. पालक, शिक्षक, संस्थांनी मोहीम यशस्वी करावी; आरोग्य विभागाचे आवाहन