अर्जुन पुन्हा एकदा चैतन्यला फोन करतो, यावेळी तो फोन उचलतो. मात्र चैतन्यचं बोलणं अर्जुनच्या लक्षात येत नाही. त्याला काहीतरी गडबड वाटते. दुसऱ्या दिवशी सकाळी अर्जुन सर्वांसमोर चैतन्यची शाळा घेतो. काल रात्री तू कुठे होतास असा सवाल तो सर्वांसमोर विचारतो. बराच वेळ चैतन्यचा संपर्क न झाल्याने सुभेदार कुटुंबीय चिंतेत असतात. कल्पना त्याला थेट सवाल करते की त्याचं सुभेदारांकडे येणं कमी झालं आहे, हल्ली तो कुठे एवढा व्यग्र असतो. अर्जुनचे बाबा आणि अर्जुनही त्याच्या बेजबाबदार वागण्यामुळे चैतन्यवर वैतागतात. अश्विन तर त्याला उठाबशा काढायला सांगतो, तेव्हा सायली त्याच्या मदतीला धावून येते.
सुभेदार कुटुंबीय त्याला घरातील मुलगा मानत असतात आणि त्यांची अशी काळजी पाहून चैतन्य भारावून जातो. तेव्हा कल्पना त्याला जन्माष्टमीनिमित्त घरीच थांबण्यास सांगते. सुभेदारांकडे कृष्णजन्माची तयारी सुरू असते. घरात जी सजावट करण्यात आलेली असते त्याचं श्रेय अश्विन सायलीला देतो. तेव्हा अर्जुन त्याच्या बायकोचं कौतुक करतो आणि अस्मिता काहीच काम करत नसल्याने तिला टोमणा मारतो. तर पूर्णा आजीला सायलीने पूजा करताना केलेले बदल पटत नाही. कल्पना म्हणते की सायलीने सर्व गोष्टी मनापासून केल्या आहेत, तर पूर्णा आजी तिने तिच्या मनासारखं केल्याचं म्हणत सायलीला नावं ठेवते. तेव्हा अर्जुन सायलीची बाजू घेतो आणि सायली पुन्हा एकदा नमतं घेते.
सुभेदारांच्या घरात कृष्णजन्मानिमित्त जशी सजावट दरवर्षी होते तशी न झाल्याने पूर्णा आजीचा त्रागा होत असतो. अस्मिता या आगीत तेलच ओतते. मात्र सायलीने हे सारे बदल अर्जुन आणि कल्पना यांच्याशी चर्चा करुनच केलेले असतात. तरीही सायली नमतं घेते, मात्र अस्मिता तिच्या तोंडाचा पट्टा सुरुच ठेवते. शिवाय अस्मिता सायलीने काढलेली रांगोळीही खराब करते. पूर्णा आजीचं म्हणणं असतं की कल्पना तिला खूप पाठिशी घालते. पूर्णा आजी सतत तिला बोल लावत असल्याने कल्पनाच्या रागाचा पारा चढतो. ‘सायली सतत चुका करते, तिच्यात फक्त दोष आहेत आणि मी तिच्या दोषांना खतपाणी घालते’, असं म्हणून ती सायलीवर वैतागते. सायलीला ती तिथून उठायला सांगते. कल्पनाचा कधीही न पाहिलेला अवतार यावेळी पाहायला मिळतो. कल्पना अर्जुनला म्हणते की, तुझ्या बायकोला डोक्यावर मीच चढवलं आहे तर तिला धडाही मीच शिकवणार. पूर्णा आजीही कल्पनाचा असा अवतार पाहून हडबडून जाते, अस्मिता खुशीत गाजरं खाऊ लागते.
त्यावेळी कल्पना घोषित करते की जन्माष्टमीच्या पूजेसाठी सायली तिथे थांबणार नाही. दुसरीकडे सुमन जन्माष्टमीसाठी फुलं घेण्यासाठी बाजारात गेलेली असते, तिथे तिला तिची जाऊबाई अर्थात प्रतिमा (तन्वीची आई) दिसते. पुढील भागाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे की कल्पना सायलीला त्यांच्या खोलीत कोंडून ठेवते. अर्जुनने समजावूनही ती कल्पना कोणाचच ऐकत नाही. पूर्णा आजीला कल्पनाचं हे वागणं पाहून धक्का बसतो.