टीम मटा, मुंबई : मुंबईमध्ये श्रावण महिन्यामध्ये सुरू होणारा सणांचा उत्साह दिवाळीपर्यंत कायम राहतो. यातही लालबाग, परळमधील गणेश आगमन सोहळेही या चैतन्याचे केंद्र असतात. गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना शनिवारी मुंबईतील अनेक मोठ्या मंडळांनी गणेशमूर्तींना मंडपामध्ये आणले. या आगमन मिरवणुकांमध्ये सहभागी होण्यासाठी, उंचच उंच मूर्ती पाहण्यासाठी मुंबई आणि महामुंबई परिसरातील युवावर्गाने लालबाग-परळ भागामध्ये मोठी गर्दी केली होती. रस्त्यांवरून वाजत गाजत जाणाऱ्या मिरवणुकांनी प्रत्यक्ष उत्सवाच्या काळातील यंदाच्या उत्साहाची चुणूक दाखवली.

दुसऱ्या शनिवारमुळे अनेक कार्यालये, शाळांना सुट्टी असताना लोकलमध्ये मात्र प्रचंड गर्दी होती. यामध्ये युवावर्गाचे प्रमाण अधिक होते. ‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर करत ही गर्दी मुंबई उपनगरे, ठाणे, डोंबिवलीपासून दादर, परळला रवाना होत होती. मुंबईतील आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्ये मुंबईकरांना एकाच ठिकाणी येऊन मुंबईतील विविध प्रसिद्ध मंडळांतील गणेशमूर्ती पाहता येतात. त्यामुळे आगमन आणि विसर्जन मिरवणुका विशेष असतात. मध्य रेल्वेच्या परळ, करी रोड, चिंचपोकळी तसेच पश्चिम रेल्वेच्या प्रभादेवी, लोअर परळ या स्थानकांवर हाच गणेश आमगन मिरवणुकांचा खास अनुभव घेण्यासाठी अनेक हौशी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. लाखो मोबाइलच्या कॅमेरे, व्यावसायिक कॅमेरे घेऊन वावरणारी मंडळी हे सारे क्षण टिपत होती. विविध सोशल मीडियावर हे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले जात होते.

मुंबईतील समुद्रकिनारे होणार दुर्गंधीमुक्त, महापालिकेचा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…
चिंचपोकळीच्या चिंतामणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांमध्ये अधिक उत्सुकता होती. यासोबतच परळचा राजा, चिराबाजारचा महाराजा, अँटॉप हिलचा महाराजा, अंधेरीचा महाराजा, कुंभारवाड्याचा राजा, मरोळचा मोरया, अंधेरीचा पेशवा आदी मोठे गणपतीही मंडपांमध्ये विराजमान झाले. या मूर्ती पाहण्यासाठीही मोठी गर्दी झाली होती.

या आगमन मिरवणुकांमधील ढोलताशे, लेझीम यांचे शिस्तबद्ध वादन, नृत्य अनुभवण्यासाठीही युवावर्ग कायमच उत्सुक असतो. मात्र यामुळे मिरवणूक लांबत असल्याने अनेक मंडळांनी मुख्य रस्त्यांवर ढोलताशे न वाजवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले. त्याऐवजी मंडपाजवळ मूर्ती आल्यावर बाप्पाचे स्वागत ढोलताशांच्या गजरात करण्यात आले. असे असूनही वाहतूककोंडीची समस्या अनुभवल्याचे परळवासीयांनी सांगितले. दुपारनंतर परळपासून गिरगावच्या दिशेने आणि सायनच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही रस्त्यांवर कोंडी झाल्याचे चित्र होते. मात्र यंदा पोलिस नियोजनामुळे अधिक शिस्तबद्धता अनुभवायला मिळाल्याच्या प्रतिक्रियाही स्थानिकांनी दिल्या. विविध ठिकाणी पोलिस मित्र मदत कक्षाचे मनोरे उभारण्यात आले होते. या पोलिसांची नजर गर्दीवर होती. यामुळे हुल्लडबाजीचे प्रमाणही कमी जाणवल्याचे दरवर्षी मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या भाविकांनी नमूद केले.

समन्वय समितीच्या पर्यायांचा अवलंब

बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने पोलिस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत आगामी काळात गणेशमूर्तींच्या आगमनासाठी काही पर्याय सुचविले होते. या पर्यायांचा अवलंब करीत शनिवारी मुंबईतील सर्वांत मोठे आगमन असणाऱ्या चिंचपोकळीचा चिंतामणी आणि परळचा राजा नरेपार्क यांचे आगमन शिस्तबद्धरित्या पार पडले. यासाठी मंडळांच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत वाहतुकीस आणि विभागातील नागरिकांना त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पोलिस प्रशासनाने लालबागमध्ये येणारी वाहतूक भायखळा, आर्थर रोड येथे काही वेळासाठी थांबवली होती, तसेच इतर मूर्तिकारांनी दुपारी १२ ते ५ यावेळेत मंडळांना मूर्ती देऊ नये, असे आवाहन केले होते. यामुळे चिंतामणी व परळचा राजा मंडळाने दिलेल्या वेळेत आपल्या गणेशमूर्ती विभागात घेऊन जात वाहतूक सुरळीत ठेवण्यास सहकार्य केले. रविवारीही मोठ्या प्रमाणावर लालबाग परिसरातून गणेशमूर्ती मंडपांकडे रवाना होणार असून, पोलिस प्रशासनाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Mumbai Monsoon: तलाव क्षेत्रात पाणीसाठ्याने नागरिकांना दिलासा, मुंबईकरांची पाणीकपात टळणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *