गौरवनं ‘माझिया प्रियाला प्रीत कळेना’ या मालिकेतून पदार्पण केलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं त्याला लोकप्रियता मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून.प्रेक्षकांमध्ये गौरव फिल्टर पाड्याचा बच्चन म्हणून लोकप्रिय आहे. आता हा फिल्टर पाड्याचा बच्चन सिनेमांतही झळकला आहे. गौरवनं काम केलेला हवाहवाई हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. अभिनयाबरोबरच गौरव सोशल मीडियावर देखील खूपच सक्रीय आहे. त्याच्या कामासंदर्भातील अपडेट तो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना देत असतो. आता देखील गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे. त्याची ही पोस्ट खूपच चर्चेत आली आहे.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाबरोबरच गौरव सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. गौरवनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरी शेअर करत याबाबत माहिती दिली. मुंबई विमानतळावरील फोटो गौरवनं शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताना त्यानं ‘लंडन कॉलिंग’ म्हटलं आहे. गौरव नक्की लंडनला कशासाठी गेला हे मात्र त्यानं गुलदस्त्यात ठेवलं आहे. लंडनला जात असताना गौरवच्या चेहऱ्यावर अगदी आनंद स्पष्ट दिसत आहे.
याआधी गौरव अभिनेते भरत जाधव यांच्याबरोबर सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेला होता. तो गौरवचा पहिलाच परदेश दौरा होता. त्यावेळी गौरव म्हणाला होता की, परदेशवारी करणारा घरातला आणि ज्या चाळीत रहातो तिथला मी पहिला आहे. त्यानंतर महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमाचा दुबई दौरा झाला. तेव्हा देखील गौरव दुबईला गेला होता. दुबईला गेल्यावर तिथं देखील गौरवचे चाहते होते. त्याला पाहण्यासाठी अनेकजण लांबून आले होते.