-नेमके काय घडले?
बांगला देशाविरुद्ध पहिल्यांदा फलंदाजी करताना, श्रीलंकेचा चौथा गडी सदीरा समरविक्रमा बाद झाला, त्यावेळी त्यांची अवस्था २४.२ षटकांत १३५ होती. अँजेलो मॅथ्यूज मैदानावर उतरला, तेव्हा त्याने हेल्मेट अॅडजस्ट केले. मात्र, हेल्मेटची पट्टी तुटली होती. त्याने ‘डगआउट’ खेळाडूकडे इशारा करून नवे हेल्मेट मागवले. यात जो वेळ गेला, त्यावर शकीब उल हसनने नियमांचे अस्र बाहेर काढले. पंचाकडे दाद मागितली. नियमानुसार निर्धारित दोन मिनिटे उलटल्याने पंचांनी मॅथ्यूजला बाद ठरविले. हतबल मॅथ्यूज नवे व तुटलेले हेल्मेट दाखवत पंच आणि शकीबकडे याचना करीत होता. पंच नियमाच्या पलीकडे जाऊ शकत नव्हते आणि शकीब ठाम होता. दुर्दैवाने मॅथ्यूजला आल्यापावली तंबूत परतावे लागले.
-नियम काय सांगतो?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘४०.१.१’च्या नियमानुसार बाद झालेल्या खेळाडूने मैदान सोडल्यानंतर दुसऱ्या खेळाडूने दोन मिनिटांत चेंडूचा सामना करायला हवा. अन्यथा पंच त्या खेळाडूला बाद ठरवू शकतात. या नियमावर शकीबने बोट ठेवले.
– पंच काय म्हणाले?
या घटनेनंतर ‘टाइम आउट’च्या नियमाने क्रिकेटविश्वाच्या भुवया उंचावल्या. चर्चा झडल्या. मात्र, या सामन्याचे चौथे पंच अँड्रियन होल्डस्टोक यांनी महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, की ‘हा निर्णय देण्यापूर्वी एक ‘प्रोटोकॉल’ पाळला जातो. मॅथ्यूज खेळपट्टीवर उतरला, तेव्हापासून टीव्ही अंपायर सर्वांत आधी दोन मिनिटांवर लक्ष ठेवतो. तो मैदानावरील पंचाला माहिती देतो. हेल्मेटची पट्टी तुटण्यापूर्वीही दोन मिनिटांच्या आत चेंडूचा सामना करण्यासाठी मॅथ्यूज तयार नव्हता.’ याउलट मॅथ्यूजने सांगितले, की ‘माझ्याकडे पुरावे आहेत. टीव्ही फुटेज आहे. दोन मिनिटांना पाच सेकंद बाकी असताना मी चेंडूचा सामना करण्यासाठी तयार होतो. हे पुरावे आम्ही सर्वांसमोर ठेवू’.
-… तर पहिला बळी गांगुली?
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने उदारपणा दाखवला नसता, तर हा नकोसा ‘टाइम्ड आउट’चा विक्रम सौरव गांगुली याच्या नावे सोळा वर्षांपूर्वीच नोंदला गेला असता. २००७ मध्ये भारत-दक्षिण आफ्रिका कसोटीत वसीम जाफर आणि वीरेंद्र सेहवाग हे भारताचे सलामीवीर तिसऱ्याच षटकात तंबूत परतले. क्रमवारीनुसार सचिन तेंडुलकर येणार होता. मात्र, आफ्रिकेची फलंदाजी सुरू असताना, सचिन काही काळ मैदानाबाहेर राहिल्यामुळे तितका वेळ त्याला येता येणार नाही, असे तिसऱ्या पंचांनी सांगितले. लक्ष्मणही तयार नव्हता. अखेर गांगुली धावपळ करीत खेळपट्टीवर पोहोचला. भारताने सहा मिनिटे दवडली. कसोटीत ‘टाइम्ड आउट’ तीन मिनिटे आहे. ‘तुला गांगुलीच्या विरोधात अपील करायचे आहे का’, असे पंचांनी स्मिथला विचारले. खिलाडूवृत्ती दाखवत स्मिथने नकार दिला.
-खिलाडूवृत्तीचे काय ?
क्रिकेटला सभ्य माणसांचा खेळ म्हटले जाते. २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार हाच अँजेलो मॅथ्यूज होता. त्या वेळी गोलंदाज सचित्र सेनानायकेने जोस बटलरला ‘मंकडिंग’ पद्धतीने बाद केल्यानंतर त्याचे समर्थन मॅथ्यूजने केले होते. त्या वेळी मॅथ्यूज चूक होता, आज खिलाडूवृत्तीवर तोंडसुख घेताना तो योग्य कसा? आणि खिलाडूवृत्तीचे काय? तीच विकसित होत नसेल तर ते नियम, ते खेळ काय उपयोगाचे?