भारतीय संघाने आफ्रिदीसारख्या गोलंदाजांचा सामना करण्याची डोकेदुखी लक्षात घेऊन डावखुरे थ्रो डाउन तज्ज्ञ नूवान सेनेविरत्ने यांची निवड केली आहे. ‘सरावाचा नक्कीच फायदा होतो. ते आता संघासोबत सात-आठ वर्षांपासून आहेत. सर्व गोलंदाजींचा सामना करण्याचे पर्याय आहेत,’ असे गिलने सांगितले. मात्र, त्याच वेळी त्याने पाकच्या गोलंदाजांचा सामना करणे जास्त आव्हान असल्याचे सांगितले. ‘पाकिस्तानचे गोलंदाज खूपच भिन्न आहेत. त्याची प्रत्येकाची खासियत आहे. शाहीन चेंडू खूप स्विंग करतो. नसीमचा वेग खूप आहे. त्याला खेळपट्टीकडून मदत हवी असते. भिन्न वातावरणात त्यांचा सामना करणेही अवघड असते,’ असे गिल म्हणाला.
‘आम्हा सलामीवीरांना संघाला चांगली सुरुवात करून द्यावी लागेल. सुरुवातीपासून त्यांच्या गोलंदाजीवर वर्चस्व राखणे आवश्यक आहे. रोहितला चेंडू हवेतून फटकावणे आवडते, तर माझी पसंती ग्राउंड स्ट्रोक्सना असते. आमची फलंदाजीची शैली भिन्न आहे, हे प्रतिस्पर्ध्यांसमोर आव्हान असते,’ असे गिलने सांगितले. मात्र, त्याच वेळी त्याने पाकचा सामना करण्याचे अतिरीक्त दडपण संघावर नसल्याचे आवर्जून सांगितले.
आशिया कपमधील पाकविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या वेळी थोडेसे वेगळे दडपण होते. मी प्रथमच वरिष्ठ स्तरावर पाकविरुद्ध खेळत होतो. अर्थात, सामना कोणताही असो, त्याचे दडपण असतेच, असेही यावेळी शुभमन गिलने सांगितले.