गिरणा धरणातून जलकुंभात पाणी येण्यास सुरुवात:14 नोव्हेंबरला जलकुंभाजवळ फुटली होती जलवाहिनी
नांदगाव शहर व ५६ खेडी पाणीपुरवठा योजनेची जलवाहिनी १४ नोव्हेंबर रोजी फुटल्याने शहरातील अंडरपासमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला होता. अंडरपासच्या येवला रस्त्यावरील मुखाच्या तोंडावर लिकेज असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी दुपारी जेसीबीच्या साह्याने काँक्रीट रस्ता खोदून त्याखाली असलेले लिकेज दुरुस्त करण्यास सुरुवात केली आहे. येथील अंडरपासमध्ये पाइपलाइनमधून होणाऱ्या गळतीमुळे नेहमी पाणी साचण्याची समस्या उद्भवते १४ नोव्हेंबरला पहाटेच मोठे लिकेज झाल्याने दिवसभर अंडरपासमध्ये गुडघ्याएवढे पाणी होते. आठवडे बाजार असल्याने शहरातील व ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना वळसा मारून गावात यावे लागले होते. त्यामुळे संभाजीनगर रस्त्यावरील पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. काँक्रीट रस्त्याच्या खाली सुमारे चार फूट अंतरावर असलेले लिकेज जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले होते शुक्रवारी जेसीबीच्या सहाय्याने रस्ता खोदून दोन पाईपना जोडणाऱ्या सांध्यांमध्ये नवी रिंग आणि शिसे टाकून हे लिकेज काढण्यात आले. लिकेज काढलेल्या ठिकाणी टेस्टिंग केल्यानंतर गिरणा धरणातून नांदगाव शहरातील जलकुंभात पाणी येण्यास सुरुवात होणार आहे.