गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात:भरधाव बस भररस्त्यात उलटली; तब्बल 12 प्रवाशांचा मृत्यू, 15-20 जण जखमी, काही गंभीर
गोंदियात शिवशाही बसचा भीषण अपघात झाला असून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी व डव्वा गावाजवळ हा अपघात घडला. दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस उलटली. या अपघातात 30 ते 35 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज दुपारी १२ ते साडेबारा वाजेच्या दरम्यान शिवशाही बस ( क्रमांक एमएच 09 ईएम 1273) बस नागपुरहून गोंदियाकडे येत होती. खजरी व डव्वा गावाजवळ आल्यानंतर दुचाकी अचानक समोर आली. दुचाकी चालकाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस उलटली. अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून बसमधून 7 ते 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचाव कार्य सुरू आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या अपघाताचे वृत्त समजताच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताबद्दल स्थानिक प्रशासनाकडून माहिती घेतली. तसेच जखमी लोकांवर तातडीने आणि योग्य उपचार करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यासोबतच मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेत मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तसेच या घटनेत जे लोक जखमी झाले, त्यांना खाजगी रुग्णालयात उपचार द्यावे लागले तरी ते तातडीने द्या, असे निर्देश देण्यात आले आहेत. आवश्यकता भासल्यास त्यांना नागपूरला हलविण्याची व्यवस्था करा, असेही मी गोंदियाच्या जिल्हाधिकार्यांना सांगितले असल्याचे फडणवीसांनी म्हटले.